नागपूर : घाईगडबडीत कुणी प्रवासाला निघालेल्या शंभरावर व्यक्तींच्या सामानाचा छडा लावून त्या चिजवस्तू ज्याच्या त्याला परत करण्याची कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बजावली आहे. चोरीला गेलेले सामान परत मिळत नाही, असा गैरसमज दूर करून या निमित्ताने आरपीएफने प्रवाशांच्या मनात एक नवा विश्वासही निर्माण केला आहे.
अलिकडे विविध मार्गावरील रेल्वे गाड्यांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. या गर्दीची संधी साधून चोर भामटे प्रवाशांचे किंमती सामान, रोख रक्कम लांबवित आहेत. तशा तक्रारीही नेहमीच वेगवेगळ्या रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होतात. दुसरीकडे अशा चोर भामट्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी असलेले आरपीएफही सक्रिय असते. गर्दीतून ते संशयीतांना हेरतात आणि चाैकशीतून चोर-भामट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून गुन्ह्यांची कबुली मिळवतानाच चोरीचे साहित्यही जप्त करतात.
जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने पन्नासावर चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून २१ लाख, ३७ हजारांच्या चिजवस्तू जप्त केल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर मोबाईल्स आहेत. काही प्रवाशांचे चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम आणि ईतर चिजवस्तूंचाही समावेश आहे. आरपीएफने या सर्व चिजवस्तूंची ओळख पटवून त्या ज्याच्या त्यांना परतही केल्या आहेत.
विद्यार्थ्यांची कागदपत्र, मोबाईलही मिळाला
रोजगार अथवा अन्य शैक्षणिक कामाच्या निमित्ताने गावोगावचे विद्यार्थी प्रवासाला निघतात. चोर-भामटे त्या विद्यार्थ्यांनाही सोडत नाहीत. त्यांच्या बॅग, मोबाईल लंपास करतात. शैक्षणिक कागदपत्रे चोरीला गेली तर अनेक विद्यार्थी नैराश्याने घेरले जातात. आरपीएफने चोरट्यांना जेरबंद केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून काही विद्यार्थ्यांचे चोरीला गेलेले मोबाईल अन् शैक्षणिक तसेच अन्य महत्वाची कागदपत्रही परत मिळवून दिली आहेत.
तातडीने तक्रार नोंदवा
एकदा चोरीला गेलेली चिजवस्तू परत मिळत नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, वेळीच आरपीएफ किंवा रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यास गुन्ह्यांचा छडा लावणे सोपे असते. त्यामुळे प्रवाशांनी असे काही झाल्यास रेल्वेच्या हेल्पलाईन नंबरवर, आरपीएफ किंवा रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.