ठळक मुद्देनागपूर विभागातील सोनखांब-कोहली रेल्वेस्थानकदरम्यानची दुर्घटनाएक प्रवासी जखमी : सहा गाड्यांना विलंब
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सोनखांब ते कोहली रेल्वेस्थानकादरम्यान धावत्या गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या ए-२ कोचचे चाक तुटल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ ते ८.१५ दरम्यान घडली. प्रसंगावधान राखून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही गाडी थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. अर्थात हे जवान शेकडो प्रवाशांसाठी देवदूत ठरले आहेत. या घटनेत एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून यामुळे दिल्ली मार्गावरील सहा गाड्यांना विलंब झाला.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सोनखांब ते कोहली दरम्यान सकाळी रेल्वेगाडी क्रमांक १५०१५ ही नागपूरकडे येत होती. अचानक या गाडीच्या कोच क्रमांक १४०८८/सी वातानुकूलित ए-२ कोचचे चाक तुटले. यामुळे जोराचा आवाज झाला. चेन पुलिंग केल्यानंतर गाडीचे चाक तुटल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर चाक तुटलेला कोच वेगळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. दरम्यान दुपारी २.२० वाजता चाक तुटलेले कोच वेगळा करून ही गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. दुपारी २.५० वाजता ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीला वातानुकूलित टु टायर कोच लावल्यानंतर दुपारी ४.१४ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. प्रवाशांसाठी भोजनाच्या पॅकेटची व्यवस्थाघटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने दक्षिण एक्स्प्रेसने ३५० भोजनाचे पॅकेट गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी रवाना केले. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतरही प्रवाशांसाठी खाद्यपदार्थांची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी काटोल नगर परिषदेतर्फेही पाण्याचे टँकर प्रवाशांसाठी पाठविण्यात आले होते.आरपीएफ जवानांमुळे अनर्थ टळलागोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या ए-२ कोचमधील विकास सिंग नावाच्या प्रवाशाने आवाज आल्यानंतर चेन पुलिंग केले. त्यावर गाडी थांबली परंतु इतर प्रवाशांनी पुन्हा (फुट राईट) चेन वर केल्यामुळे गाडी पुढे निघाली. दरम्यान भोपाळवरून या गाडीत गस्त घालत येणारे रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव तुकडीचे जवान प्रमोद दैने, युवराज तलमले, अनिल कुमार हे गाडीखाली उतरले होते. त्यांना या कोचचे चाक तुटल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी धावत्या गाडीत चढून पुन्हा चेन पुलिंग करून गाडी थांबविली. आरपीएफ जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टाळता आली.मोठी दुर्घटना टळली‘रेल्वेत अशा प्रकारच्या दुर्घटना फार कमी होतात. या घटनेचे परिणाम फार गंभीर होऊ शकले असते. परंतु ईश्वराच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली. घटना घडल्यानंतर तातडीने गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस थांबविण्यात आली. गाडीतील प्रवाशांसाठी पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली. नागपुरात ही गाडी आल्यानंतर दुसरा वातानुकूलित कोच लावून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.’-सोमेश कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभागरेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्तगोरखपूर यशवंतपूर ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर येण्यापूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक ए. जी. राव, आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. याशिवाय २५ खाजगी सुरक्षा रक्षक, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ४० जणांचा ताफा तैनात करण्यात आला होता.या गाड्यांना झाला विलंबगोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या घटनेमुळे इटारसीवरून नागपूरकडे येणाऱ्या सहा रेल्वेगाड्यांना ३ ते ५ तासांचा विलंब झाला. या गाड्या अशा
- २२६९२ हजरत निजामुद्दीन-बंगळुर राजधानी एक्स्प्रेस
- १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद तेलंगाणा एक्स्प्रेस
- १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस
- १२६८८ डेहराडून-मदुराई सुपरफास्ट एक्स्प्रेस
- १६०९४ लखनौ-चेन्नई सेंट्रल गोमतीसागर एक्स्प्रेस
- १२७९२ दानापूर-सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस