नागपूर : संविधान आणि पर्यायाने देशाला वाचवण्यासाठी भाजपला हटविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)ने इंडिया आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आघाडीच्या काही नेत्यांशी बोलनी सुरू आहे, अशी माहिती रिपाइं (आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे व महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
निकाळजे यांनी सांगितले, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशाचे संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजपला हटविणे आवश्यक झाले आहे. यासाठी इंडिया आघाडीला अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. तसेच येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात २४ ऑक्टोबर रोजी जवाहर वसतिगृह येथे पक्षाची राष्ट्रीय बैठक व कार्यकर्ता संमेलन बोलावण्यात आले आहे. या बैठकीत देशातील विविध राज्यांच्या प्रतिनिधी उपस्थित राहतील. यात पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल. या बैठकीत इतरही विविध विषयांचे ठराव पारित केले जातील. पत्रपरिषदेला नागपूर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.