लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-सेना युतीसोबतच राहू. आम्हाला किमान दहा जागा हव्या आहेत. चर्चा सुरु आहे. परंतु आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. रिपाइंला एकच निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.आठवले म्हणाले, लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. विरोधी पक्षाजवळ आता काहीच बोलायला शिल्लक नाही. त्यामुळे विरोधक ईव्हीएम मशीनच्या मागे लागले आहेत. उद्या बॅलेट पेपरवरही निवडणुका झाल्या तरी भाजप युतीच जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. बॅलेट पेपरने निवडणुका घ्यायच्या की नाही, याचा निर्णय मात्र निवडणुक आयोगच घेईल, असेही सांगितले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-सेना-रिपाइंचीच सत्ता येणार. भाजपच्या जास्त जागा निवडून येतील, आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव मंजूररिपाइं (आ)चा विदर्भस्तरीय महामेळावा शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, महासचिव मोहनलाल पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्यात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसह एकूण १२ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये गोसेखुर्द व निम्म पैनगंगा धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, नदी जोड प्रकल्प विदर्भात राबवण्यात यावा, अतिक्रमित गायरान, पडीक वन जमीन कसणाऱ्या भूमिहीनांना द्यावी, झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक नागपूरला तातडीने पूर्ण करावे, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाची बंदी उठवावी, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांना निधी उपलब्ध करावा, आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, आदींचा समावेश होता. यावेळी सुधाकर तायडे, पूरण मेश्राम, ब्रह्मानंद रेड्डी, भीमराव बंसोड, राजन वाघमारे, बाळू घरडे, आर.एस. वानखेडे, राजू बहादुरे, विनोद थुल, सतीश तांबे, कांतीलाल पखिड्डे आदी उपस्थित होते.
रिपाइं (आ) कमळावर लढणार नाही : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 8:54 PM
आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
ठळक मुद्देबॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरी आम्हीच जिंकू