लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी बाजारात विशेषत: शिकागोमध्ये यंदा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने देशांतर्गत सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलांच्या भावात केवळ एक आठवड्यात प्रति किलो १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीने दरवाढीत भर टाकली आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांचे बजेट बिघडले असून, वाढत्या दरावर नियंत्रण आणण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.
इतवारीतील राणी सती एंटरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, यंदा पाऊस चांगला असून सोयाबीन पीक भरघोस येण्याची शक्यता आहे. पण, त्यापूर्वी तेलाची विदेशी बाजारपेठ आणि नेपाळमधून सोयाबीन व पाम तेलाची आयात कमी होताच भाववाढ होऊ लागली आहे. नेपाळमधून ड्युटी फ्री तेलाची आयात सुरू झाल्यानंतर सर्व खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो १२ ते १५ रुपयांची घसरण झाली होती. पण, अचानक दरवाढीने ग्राहकांना खाद्यतेल जास्त भावातच खरेदी करावे लागत आहे.
सध्या खाद्यतेलाचे दर नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत जास्तच आहेत. दिवाळीत सोयाबीन तेल ९५ रुपये किलो होते, हे विशेष. सध्या जवस तेलाचे भाव २० रुपयांनी वाढून १८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सोयाबीन तेल १६० रुपये आणि शेंगदाणा तेलाचे १६४ रुपये किलो भाव असून, जवळपास सारख्याच किमतीत मिळत आहे. त्यामुळे शेंगदाणा तेलाला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी दोन्ही तेलांमध्ये २५ ते ३० रुपयांचा फरक होता. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन प्रति क्विंटल ९ हजारांवर गेले आहे. घाऊक विक्रेत्यांकडून माल आल्यानंतर थोडा नफा कमवून किरकोळ तेलाची विक्री करतात, असे अग्रवाल म्हणाले.
तेलाचे भाव अचानक का वाढतात?
खाद्यतेल स्वयंपाकघरातील अत्यावश्यक वस्तू आहे. एकूण सर्व खाद्यतेलांपैकी विदर्भात ७० टक्के सोयाबीन तेलाची विक्री होते. यंदा सोयाबीन पीक विदेशात कमी येण्याच्या वृत्ताने देशांतर्गत एक आठवड्यातच सोयाबीनसह सर्वच तेलांचे भाव अचानक वाढले. व्यापाऱ्यांकडे पूर्वीचाच स्टॉक आहे. पण, ठोक व्यापारी एकत्रितरीत्या तेलाचे भाव वाढवितात, असा अनुभव दरवाढीने आला आहे. अतिरिक्त नफा कमविण्यासाठी व्यापारी दरवाढ करतात. अशा घाऊक व्यापाऱ्यांवर सरकारने धाडी टाकून त्यांचा स्टॉक तपासावा आणि हा स्टॉक केव्हाचा आहे, याची माहिती घ्यावी. त्यानंतर सर्व गौडबंगाल बाहेर येईल. भाववाढीने गरीब व सामान्यांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो. सरकारने व्यापाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे यांनी केली आहे.
खाद्यतेलाचे प्रति किलो दर रुपयांत :
खाद्यतेल २१ जुलै २८ जुलै
सोयाबीन १५० १६०
शेंगदाणा १५५ १६४
राईस १५० १६०
सूर्यफूल १६० १७०
जवस १७० १८०
पाम १४५ १५५
मोहरी १६० १७०
तीळ १७० १८०