लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती सिलिंडरचे दर चार वर्षांत पहिल्यांदा ५०-५० रुपयांनी दोनदा वाढविले आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी असून ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये दररोज वाद होत आहेत. वाढीव दरामुळे ग्राहकांच्या खात्यात १४० रुपयांची सबसिडी जमा होत असल्याचे वितरकाचे मत आहे. पण अजूनही ग्राहकाच्या खात्यात केवळ ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे, हे विशेष. यावर खुलासा करण्याची ग्राहकांची मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरानुसार देशांतर्गत सिलिंडर दराची चढउतार महिन्याच्या अखेरच्या तारखेला मध्यरात्री होते. त्यानुसार वितरक ग्राहकांकडून दर वसूल करतात. नोव्हेंबरमध्ये घरगुती सिलिंडरचे दर ६४६ रुपये होते. १ डिसेंबरच्या मध्यरात्री १४.२ किलो घरगुती सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढविले. सिलिंडर ६९६ रुपयांचे झाल्याचे वृत्त झळकताच ग्राहकांनी ५० रुपये दरवाढ देऊ केली. पण १४ डिसेंबरच्या मध्यरात्री तेल कंपन्यांनी पुन्हा सिलिंडरची ५० रुपयांनी दरवाढ केली. याची कल्पना ग्राहकांना नव्हती. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केलेल्या ग्राहकांना १३ आणि १४ तारखेला ६९६ रुपये सिलिंडरच्या दराचे मॅसेज मोबाईलवर आले. त्यानंतर १४ च्या मध्यरात्री दरवाढ झाल्याने ग्राहकांना ७४६ रुपये दराने सिलिंडरचा पुरवठा होऊ लागला. पण ग्राहकांना पूर्वीच ६९६ रुपये किमतीचा मॅसेज आल्याने ग्राहकांचा गैरसमज झाला आणि डिलिव्हरी बॉयसोबत वाद होऊ लागले. ५० रुपये जास्तचे का आकारत आहेत, अशी विचारण ग्राहक डिलिव्हरी बॉयला करू लागले. अनेकांनी वितरकाला फोन लावून विचारणा केली. अशा स्थितीत कंपन्यांनी पुन्हा ५० रुपये सिलिंडरचे दर वाढविल्याचे समजावून सांगताना वितरकाला त्रास होत आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर वितरक म्हणाला, १५ दिवसात सिलिंडरचे दर दोनदा वाढविण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिन्याच्या अखेरीस चढउतार होते, याची सर्वांना कल्पना असते. पण महिन्यात मध्यात दरवाढ पहिल्यांदा झाली आहे. याची माहिती ग्राहकांना नसल्याने दररोज वाद होत आहेत. हे वाद ज्या ग्राहकांनी पूर्वी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर १३ आणि १४ तारखेला सिलिंडर किमतीसह वितरणाचे मॅसेज गेले आहेत, त्यांच्यासोबत होत आहेत. अशा ग्राहकांना दरवाढीची देण्यात येत आहे.