लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत टुन्न असलेले तीन भाऊ रात्री त्यांच्या घरात जुगार खेळत बसले. १०० रुपयांच्या हारजीतवरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यातील एका दारुड्याने मोठ्या भावाला मारल्याची आरडाओरड करत मोहल्ला डोक्यावर घेतला. पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले. मात्र, डॉक्टरांकडून मृत्यू कसा झाला, याबाबत स्पष्ट अभिप्राय न नोंदवल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी संशयित भावाला सोडून दिले. काहीशी विचित्र अशी ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडली.
सेवानंद रोशनलाल यादव (वय ५०)असे मृताचे नाव आहे. त्याला पाच भाऊ आणि तीन बहिणी आहेत. एक भाऊ वगळता सर्वच सुदामनगरीत राहतात. मोलमजुरी करून ते दिवस काढतात. मृत सेवानंदला दारूचे भारी व्यसन होते. दिवसभर कचरा वेचून मिळालेल्या पैशातून रोज मोठ्या प्रमाणात दारू प्यायचा. त्याच्या व्यसनाला कंटाळून चार वर्षांपूर्वी त्याची पत्नी मध्य प्रदेशात निघून गेली. त्याला एक सहा वर्षांचा मुलगा आहे.
रोज रात्री सेवानंद आणि त्याचे काही भाऊ घरातच रमी (पत्त्याचा जुगार) खेळत बसायचे. रविवारी रात्री सेवानंद, त्याचा लहान भाऊ परमानंद आणि देवानंद हे तिघे नेहमीप्रमाणे दारू पिऊन रमी खेळत बसले. देवानंद निघून गेल्यानंतर जुगारात जिंकलेल्या १०० रुपयांच्या वादातून या सेवानंद आणि परमानंदमध्ये कडाक्याचा वाद झाला. नेहमीचेच रडगाणे म्हणून त्यांच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. रात्री ११ च्या सुमारास परमानंद घराबाहेर येऊन मोठमोठ्याने ओरडू लागला. सेवानंदला गळा घोटून मारल्याचे तो सांगत असल्याने अन्य भावांसह शेजाऱ्यांनी आतमध्ये धाव घेतली. खोलीत सेवानंद निपचित पडला होता. त्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले. अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सेवानंदचा मृतदेह रुग्णालयात पाठवून त्याची हत्या केल्याचे ओरडून सांगणाऱ्या परमानंदला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत टुन्न होता. त्याला व्यवस्थित बोलताही येत नव्हते.
पोलिसांसमोर पेच
दरम्यान, पोलीस हत्येचा गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मृत्यूचे कारण विचारले मात्र गळा घोटून मारल्याचे कोणतेही चिन्ह मृताच्या गळ्यावर नव्हते. डॉक्टरांनाही कारण लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या अहवालात तशी कोणतीही स्पष्ट नोंद केली नाही. परिणामी त्यांनी हत्येची कबुली देणाऱ्या कथित आरोपी परमानंदला सोमवारी सायंकाळी सोडून दिले. हत्येचा ठोस पुरावा किंवा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच या प्रकरणात कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल, असे अंबाझरी पोलिसांनी स्पष्ट केले.