कामठी : चाेरट्यांनी ‘एटीएम’ मशीनची ताेडफाेड करीत त्यातील १ लाख १० हजार रुपये चाेरून नेले. यात मशीनचे नुकसान झाले आहे. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-कळमना मार्गावरील येरखेडा येथे शुक्रवारी (दि. ४) पहाटेच्या सुमारास घडली.
येरखेडा (ता. कामठी) येथील शुभमनगरातून गेलेल्या कामठी-कळमना मार्गालगत भारतीय स्टेट बॅंकेचे ‘एटीएम’ आहे. शुक्रवारी पहाटे तिघे या मशीनची ताेडफाेड करीत असल्याची माहिती ‘ईपीएस’ कंपनीचे चॅनल मॅनेजर जितेंद्र आसाराम बसखेडा (३४, रा. न्यू सुभेदार ले-आऊट, नागपूर) यांना फाेनवर देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सूचनेवरून कर्मचाऱ्यांनी लगेच त्या ‘एटीएम’ची प्रत्यक्ष पाहणी केली.
यात चाेरट्यांनी मशीनमधील ५०० रुपयांच्या नाेटा लंपास केल्याचे आढळून आले. चाेरट्यांनी मशीनमधील १ लाख १० हजार रुपये चाेरून नेले असून, मशीनचे माेठे नुकसान केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. पाेलीस ‘एटीएम’ रूम व परिसरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत तपासाची दिशा ठरवित आहेत. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अज्ञात तीन आराेपींविरद्ध भादंवि ३९७, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.