लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुगार आणि सट्टा बाजार याीमुळे कर्जबाजारी झालेल्या एका नोकराने मित्रांच्या मदतीने स्वत:वर हल्ला करून मालकाचे १३ लाख ५० हजार रुपये लुटून नेल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी भरदुपारी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या भारतमाता चौकात ही लुटमारीची घटना घडली होती. पोलिसांनी जखमी सीसीटीव्हीची पाहणी करून आणि जखमी तरुणाची चौकशी करून या लुटमारीचा उलगडा करीत आरोपी अजय श्रीचंद चांदवानी (वय २१, रा. कस्तुरबानगर), गोयल अशोक दीपानी (वय २०, रा. जरीपटका) आणि प्रतीक मनोहर सोनी (वय २२, रा. भोपाळ) यांना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी १३ लाख २८ हजार रुपये जप्त केले.आकाश तारवानी मस्कासाथमध्ये सुकामेव्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे अजय चांदवानी हा काम करतो. तो मूळचा भोपाळचा आहे. तेथे व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने अजय सहपरिवार नागपुरात आला. तारवानीचा विश्वास जिंकल्यामुळे ते बँकेत रक्कम जमा करण्यासाठी अजयला नेहमी पाठवायचे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उलाढालीची अजयला बऱ्यापैकी माहिती झाली होती. अजय आणि त्याचा मित्र गोयलला सट्टा आणि जुगाराचे व्यसन आहे. त्यात मोठी रक्कम हरल्याने ते कर्जबाजारी झाले होते. गोयल पानटपरी चालवायचा, मात्र त्यात फारशी मिळकत नसल्याने अजय आणि गोयलने अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी लुटमारीचा कट रचला. त्यात प्रतीकला सहभागी करून घेतले. सोमवारी दुपारी तारवानीने अजयला १३.५० लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी पाठविले. ती माहिती अजयने प्रतीक आणि गोयलला फोनवरून दिली. ठरल्याप्रमाणे अजय एका बॅगमध्ये रक्कम घेऊन दुचाकीने भारतमाता चौकाकडे आला. टीबी दवाखान्याजवळ ठरल्याप्रमाणे प्रतीक आणि गोयलने त्याला रोखले आणि त्याला मारहाण करण्याचे नाटक करून रक्कम असलेली बॅग घेऊन पळून गेले. विशेष म्हणजे, आरोपींनी अजयच्या पाठीवर फार जखमा होणार नाही, अशा पद्धतीने शस्त्राचे वार केले. अजयने तारवानींना या घटनेची माहिती दिली. तारवानींनी त्याला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना सूचित केले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पोलिसही हादरले. पोलिसांनी अजयला विचारपूस केली.अन् संशयाची पाल चुकचुकलीपोलिसांनी घटनेबाबत परिसरातील व्यापारी, नागरिकांकडे चौकशी केली. मात्र अशी कोणतीही घटना घडल्याचे आम्ही बघितले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात अजयवर आरोपी सावधगिरीने वार करीत असल्याचे दिसून आले. परिणामी पोलिसांनी अजयला पोलिसी खाक्यात विचारणा केली आणि त्याने स्वत:च लुटमारीचा कट रचल्याची कबुली दिली. साथीदारांची नावेही सांगितली. त्यावरून पोलिसांनी त्याच्यासोबत प्रतीक आणि गोयलविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी १३ लाख २८ हजार रुपये जप्त केले. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय आणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.