ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 - सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर विभागाने काळापैसा प्रतिबंधक कायद्यातील (मनी लॉन्ड्रिंग) तरतूदींनुसार बुधवारी कोळसा घोटाळ्यात लिप्त सेंट्रल कॉलियरीज कंपनी लिमिटेडचे संचालक गोविंद डागा यांची संपत्ती जप्त केली. या प्रकरणी भागीदार सुनील मल यांनाही आरोपी केले आहे. ईडीने ही कारवाई दोन महिन्यांच्या चौकशीनंतर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ईडीने कोलकाता येथील चार कोटी रुपये किमतीचा फ्लॅट, चंद्रपूर येथील खाणीच्या बाजूची अंदाजे नऊ कोटी रुपये किमतीची जमीन आणि काटोल येथील कृषी जमीन जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.कंपनीने सरकारची फसवणूक करून वॉशिंग व स्पंज आयरन प्रकल्पासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलोरा टाकळी ब्लॉक-२ (टाकळी जेना बेलोरा ब्लॉकचा भाग) या कोळसा खाणीसाठी कोळसा मंत्रालयाकडे ५ जानेवारी १९९८ ला अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कंपनीने ३० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प आणि वॉशरीजसाठी दुसरा अर्ज १२ फेब्रुवारी १९९८ ला केला. या कंपनीची नोंदणी रजिस्ट्रार आॅफ कंपनीज, मुंबईकडे करण्यात आली होती. ईडीने काळापैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत डागा यांचे घर, कार्यालय आणि समूहाच्या अन्य कंपन्यांची चौकशी आणि तपासणी केली. चौकशीत ईडीला सेंट्रल कॉलियरीज कंपनीने गुन्हेगारी कट रचून आणि चुकीची माहिती देऊन खाण मिळविल्याचे आढळून आले. कंपनीने वीज प्रकल्प न उभारता खाणीतून कोळसा काढून खुल्या बाजारात विविध कोळसा व्यापाऱ्यांना विकल्याचे दिसून आले. कोळसाच्या विक्रीतून गोविंद डागा यांनी १७.१७ कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती खरेदी केल्याचे ईडीला आढळून आले. कारवाईदरम्यान ईडीने ही संपत्ती बुधवारी जप्त केली.
कोळसा घोटाळ्यात १७.१७ कोटींची संपत्ती जप्त - गोविंद डागा
By admin | Published: February 16, 2017 10:18 PM