लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची मदत मिळाली. यामुळे आतापर्यंत शहरातील १.४३ लाख पैकी १.१२ लाख पथदिवे एलईडीमध्ये परावर्तित करण्यात यश आले आहे. उर्वरित ३१ हजार एलईडी जूनअखेरपर्यंत बसविले जाणार आहेत.पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने पथदिव्यावरील वीज खर्चात दर महिन्याला २.०७ कोटींची बचत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आधी पथदिव्यांचा वीज खर्च दर महिन्याला ४.३५ कोटी होता. आता तो २.२८ कोटींवर आला आहे. संपूर्ण शहरात एलईडी बसविण्यात आल्यानंतर महापालिकेची वर्षाला ३८ कोटींची बचत होणार आहे.पथदिव्यांच्या वीज बिलावर महापालिका वर्षाला ५८ कोटी खर्च करते, म्हणजेच दर महिन्याला ४.३५ कोटी खर्च होतात, तर दर महिन्याला ६१ हजार युनिट वीजवापर होतो. स्थायी समितीत एलईडी लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर मे २०१९ पर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या धोरणामुळे अजूनही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत. काही आठवड्यात काम पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.वीज बिलावर वर्षाला १५ कोटींची बचत होईल. तसेच देखभाल व दुरुस्तीवरील खर्च विचारात घेता एकूण ३८ कोटींची बचत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पथदिव्यांवर ६१ हजार युनिट वीज खर्च होत होती. आता ३२ हजार युनिट वीज लागत आहे.एलईडीचा प्रकाश आपोआप मंदावतोया प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, पथदिव्यांच्या जागी लावण्यात आलेले एलईडी रात्री १० नंतर आपोआप मंदावतात. रात्री उशिरा १२ नंतर वीजवापर ४० टक्के कमी होतो. त्यानंतर पहाटे ६ पर्यंत ५० टक्के वीज बचत होते. अंतर्गत मार्गावर महापालिकेने ३६ वॅटचे एलईडी दिवे लावले आहेत, तर प्रमुख मार्गावर ६० वॅट, १०५ वॅट व १२० वॅट क्षमतेचे एलईडी लावलेले आहेत.