नागपूर : मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने एका प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांना ३५ लाख ७ हजार ३५० रुपये भरपाई मंजूर केली. तसेच, या रकमेवर ६.५ टक्के व्याज अदा करण्याचा आदेशही दिला.
टिप्पर मालक संदीप चकोले व न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी यांना स्वतंत्रपणे किंवा संयुक्तरीत्या या निर्णयाचे पालन करायचे आहे. मृताचे नाव रवींद्र बावनकर (३४) होते. ते भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील रहिवासी होते. त्यांचा वाहन दुरुस्तीचा व्यवसाय होता. या व्यवसायातून ते वर्षाला सुमारे तीन लाख रुपये कमाई करीत होते. १२ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी ४ च्या सुमारास त्यांच्या कारला टिप्परने जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलिसांच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर रवींद्र यांचे वडील सोमाजी, आई बानाबाई व भाऊ मनोहर यांनी भरपाई मिळण्यासाठी न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणने रेकॉर्डवरील विविध पुरावे व कायदेशीर तरतुदी लक्षात घेता, दावा अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने लेखी उत्तर दाखल करून हा दावा खारीज करण्याची विनंती केली होती. परंतु, कंपनीच्या मुद्यांमध्ये न्यायाधिकरणला गुणवत्ता आढळून आली नाही.