जिल्हाधिकारी सचिन कुर्वे : २ लक्ष ७५ हजार ३८८ खातेदारांना लाभ नागपूर : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशु, किशोर, तसेच तरुण या अंतर्गत जिल्ह्यात २ लक्ष ७५ हजार ३८८ खातेदारांना ९२५ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत युवकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिल्यात. नागपूर जिल्ह्यातीला प्रधानमंत्री मुद्र्रा योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकातर्फे विविध लाभार्थ्यांना वितरित केलेल्या कर्जासंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आढावा घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीत लिड बँकेचे व्यवस्थापक अयुब खान, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, श्रीराम बांधे, अनिल ठाकरे, आशिष मुकीन उपस्थित होते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले कर्ज प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या शिशुअंतर्गत ५० हजार रुपये, किशोरअंतर्गत ५ लक्ष, तर तरुणअंतर्गत १० लक्ष रुपयांच्या कर्जाचा पुरवठा करण्यासाठी सुलभ पद्धत अवलंबिण्यात यावी, ग्रामीण भागातील युवक-युवतींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मत्स्यपालन, मधुमाशीपालन, तसेच डेअरी, कृषी आधारित उद्योग यांनाही या योजनेत समावून घेण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी मागणी केल्यानुसार विविध बँकांनी कर्ज पुरवठा केला असून ज्या शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी कुर्वे यांनी केली. प्रारंभी लिड बँकेचे व्यवस्थापक अयुब खान यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विविध राष्ट्रीय बँकांनी वितरित केलेल्या कर्जासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी) युवकांसाठी मुद्रा लोन मेळावा प्रधानमंत्री मुद्र्रा योजनेसोबत स्टँड अप व स्टार्ट अप योजनाची जिल्ह्यात सर्व बँकांनी अंमलबजावणी करावी अशी सूचना करीत जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले की, येत्या २५ व २६ मार्च रोजी फॉर्च्युन फाऊंडेशन व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्तपणे युथ एम्पॉवरमेन्ट समीट डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी युवकांना मुद्रा योजनेबाबत माहिती देण्यासाठी मुद्रा लोन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपला सहभाग द्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सर्व बँकांना केली.
प्रधानमंत्री मुद्र्रा योजनेंतर्गत ९२५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
By admin | Published: March 23, 2017 2:28 AM