योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपारी व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून साडेनऊ लाखांची रोकड लंपास करण्यात आली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरोडा, फायरिंग व आता अशा पद्धतीने भर रस्त्यावरील गाडीतून झालेल्या चोरीमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
मोहम्मद जुबेर उर्फ मोहम्मद शफीक (३८, हबीबी काॅम्प्लेक्स, शांतीनगर) यांचे इतवारी येथे टी.के.ट्रेडर्स नावाचे सुपारीचे होलसेल विक्रीचे दुकान आहे. त्यांच्याकडे रमन पिरयानी (६२) हे रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. १६ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ते दुकानातील साडेनऊ लाखांची रोकड बॅंकेत जमा करण्यासाठी पिरयानी दुचाकीने निघाले. शुक्रवारी तलावाजवळील स्टेट बॅंक ऑफ इंडिया येथे ते गेले. डिक्कीत रक्कम ठेवून ते आत गेले. त्यानंतर ते परत बाहेर आले असता दुचाकीची चाबी दिसत नव्हती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्याला फोन करून बोलविले. दुसरी चाबी आल्यावर डिक्की उघडली असता त्यातील रोकड व तीन चेकबुक गायब होते. हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी मालकाला कळविले. त्यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे.