शमा राजेश यादव (५१, रा. खरे टाऊन धरमपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना इंटरनॅशनल बँकिंग सर्व्हिस सुरू करायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर इंडसइंड बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर संपर्क केला. पलीकडून बोलणाऱ्याने इंडसइंड बँकेचा प्रतिनिधी बोलतो, असे सांगून यादव यांच्या मोबाईलवर काही लिंक पाठविल्या. त्या आधारे यादव यांच्या बँक खात्याची माहिती घेत आरोपीने ९ लाख ६९ हजार रुपये लंपास केले. सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. सायबर शाखेतून हे प्रकरण धंतोली ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----