योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी माहितीच्या आदान-प्रदानात काहीसा हात आखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत आहे. यातच आणखी एक पाऊल पुढे टाकत संघ परिवारातर्फे आता समाजापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी ‘मोबाईल अॅप’चा आधार घेण्यात येणार आहे. या ‘अॅप’च्या माध्यमातून ‘सोशल मीडिया’वर होणाऱ्या विविध शाब्दिक हल्ल्यांसंदर्भात विविध संदर्भ सादर करत मुद्देसूद तथ्य मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१७ मध्ये संघातर्फे ‘सेवागाथा’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ सुरू करण्यात आले होते. संघाच्या सेवाकार्यांबाबत यातून माहिती मांडण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून संघावर शाब्दिक हल्ले व आरोपांचे प्रमाण जास्त वाढले आहे. विशेषत: ‘सोशल मीडिया’वर तर संघावर टीकास्त्र सोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. संघाकडून साधारणत: प्रत्येक वेळी टीकांसंदर्भात बाजू मांडण्यात येत नाही. मात्र अशास्थितीत आम्ही ‘सोशल मीडिया’वर आपली बाजू कशी मांडायची, असा प्रश्न वारंवार संघ स्वयंसेवकांकडून उपस्थित करण्यात येत होता.हीच भावना लक्षात घेऊन संघ परिवारातील काही सदस्यांनी एकत्रित येऊन ‘ऋतम्’ हे ‘मोबाईल अॅप’ तयार केले आहे. यात थेट संघाच्या प्रचार-प्रसारावर भर देण्यात आलेला नाही, तर हे एकप्रकारचे ‘न्यूज अॅग्रीगेटर अॅप’ असून येथे मोठ्या प्रमाणात बौद्धिक सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच संघ विचारधारेशी जुळलेले विविध ‘मॅगझिन’, वर्तमानपत्रे तसेच लेखकांनादेखील याच्याशी जोडण्यात आले आहे. या माध्यमातून इतिहास, संस्कृती यांच्यासह वर्तमान स्थितीसंदर्भातील विविध साहित्य, व्हिडीओ समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे; सोबतच समाजातील सकारात्मक बाबीदेखील मांडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वैचारिक मंथनासाठी उचलले पाऊलसंघाबाबतच्या अनेक ‘पोस्ट’ किंवा वृत्त विपर्यास करून मांडण्यात येतात. त्यामुळे नेमके तथ्य व माहिती वैचारिक व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे समाजातदेखील तथ्य हवे तसे पोहोचू शकत नाही. त्यामुळेच विविध माध्यमांवर लिहिणाºयांना, वैचारिक भूमिका मांडणाऱ्यांना एक मंच प्रदान करण्याचे हे माध्यम आहे. त्यांच्या विचारांनादेखील यात स्थान देण्यात येईल. विशेषत: म्हणजे आजच्या वैचारिक लढाईच्या मंथनात विचारांची स्पष्टता यावी यादृष्टीने हे ‘अॅप’ तयार करण्यात आले असल्याची माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणारया ‘अॅप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संघ परिवारातील विविध संघटनांचा मानस आहे. यासाठी देशभरात १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ‘सोशल मीडिया’वर एक मोहिमदेखील चालविण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून संघ विचार पोहोचावे यासाठी देशातील विविध भाषांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृतसह उर्दू भाषिकांचादेखील यात विचार करण्यात आला आहे. तीन महिन्यांत एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.