नागपूर : विविध मुद्यांवरून भाजपचे राजकारण तापले असताना नागपुरात गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांच्यातील समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ पातळीवरील ही बैठक आहे. अत्रे ले आउट येथील एका महाविद्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भातील भाजपचे आमदार आणि खासदार यात सहभागी झाले आहेत. दोन टप्प्यात बैठक होत असून अगोदर पूर्व विदर्भातील नंतर पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत संघ पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील या बैठकीत उपस्थित आहेत. संघाकडून विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे , प्रांत कार्यवाह अतुल मोघे, क्षेत्र कार्यकारीणी सदस्य दीपक तामशेट्टीवार हे उपस्थित आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाचे पदाधिकारी आणि भाजपच्या या बैठकीला महत्व आले आहे. विशेष म्हणजे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात बैठक न होता ती एका खाजगी महाविद्यालयात होत आहे. रेशीमबागेत प्राथमिक शिक्षा वर्ग सुरू असल्याने तेथे बैठक झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.