नागपूर: प्राचीन काळापासून चालत आलेली शाश्वत सनातन परंपरा, आचरण पद्धती यालाच आताच्या काळात हिंदू मानले गेले आहे. हिंदू हा धर्म नाही, ती एक आचरण पद्धती आहे. हिंदूत्व म्हणजे हिंदू धर्म नाही. हिंदुत्व हे कोणत्याही प्रकारचे इझम नाही. हिंदुत्वाचा विकास सर्वांनी केला आहे. हिंदूत्व हे एका संस्कृतीचे नाव आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मांडले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली परखड मते मांडली.
भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक
भारतीय माणून हा भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक आहे. हिंदूत्व कधीही पूर्णविराम मानत नाही. व्यक्तीसह सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याला हिंदूत्वामध्ये प्रोत्साहन दिले आहे. सनातन शाश्वत धर्माला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती असून, हिंदुत्व संस्कृतीचे नाव आहे. आपल्या आचरणातून जीवनाची प्रगती, विकास करणे म्हणजे सुसंस्कृतपणा आहे. नरापासून नराधम नाही, तर नारायण होणे या प्रवासाचे नाव हिंदुत्व आहे. हिंदुत्व संस्कृती सर्वत्र पवित्रता पाहते. सनातन धर्म म्हणजे मानवधर्म, मानवताधर्म आहे. समाजाचे तेच अधिष्ठान आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच. भिन्न असणे म्हणजे वेगळे असणे नाही.. विविधतेत एकता आपली ओळख आहे. सर्वांना समान संधी देणे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
बंधुभाव हाच धर्म
बंधुभाव हाच धर्म असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आहोत, हे नाते महत्त्वाचे आहे. मनामनातील आणि समाजातील बंधुत्वाशिवाय आपण टिकणार नाही. मातृभूमीच्या प्रमाने आपल्याला बांधून ठेवले आहे. भारतीय संस्कृती आपल्याला जोडून ठेवते. संघर्ष करणाऱ्या पूर्वजांना आपण आपले आदर्श मानले आहे. भाषा वेगळ्या असल्या तरी भावना एकसमान आहेत, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
दरम्यान, सर्वत्र सुखकारक असणारा करणारा म्हणजे धर्म आहे. तो कोणताही असो. एकता आहे हाच विचार समान आहे. हिंदूत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे. हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता याचा विरोध नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.