लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :‘तू नागपुरात पोहच. तेथे तुझ्या मदतीला एक बंदा येईल. तो तुला बाकीची सर्व मदत करेल’, असे सांगून जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने त्याचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख (वय २६) याला नागपूरला पाठविले होते. तपासात हे उघड झाले मात्र तो ‘बंदा’ कोण, हे उजेडात आले नाही. त्यामुळे 'त्याला' शोधून काढण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी नागपूर पोलीसच नव्हे तर गुप्तचर संस्थांसह देशभरातील तपास यंत्रणा कामी लागल्या आहेत.
काश्मिरात घातपाती कृत्यात सहभागी असलेल्या अवंतीपूर जिल्ह्यातील रईस अहमदला याला जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने नागपुरात संघ मुख्यालयासह वेगवेगळ्या संवेदनशिल स्थळांची रेकी करण्यासाठी पाठविल्याचे उघड झाले आहे. जैशच्या पाकव्याप्त काश्मिरातील नवापूर येथील लाँचिंग पॅडवरून कमांडर उमर रईसला संचलित करत होता. रईसला नागपुरात पाठविण्यापासून तो परत श्रीनगर (काश्मिर) परत येण्यापर्यंतच्या हवाई प्रवासाची, हॉटेलिंगची व्यवस्था उमरनेच केली होती.
१३ ते १५ जुलैला रईस मुंबई मार्गे नागपूरात आला आणि दिल्ली मार्गे परत गेला. या दरम्यान उमर रईसच्या सलग संपर्कात होता. उमर यालाच रईसने येथील रेकीचे व्हिडिओ, फोटो पाठविल्याचेही तपासात उघड झाल्याचे तपास अधिकारी सांगतात.
‘तू नागपुरात पोहचल्यानंतर तेथे तुझ्या मदतीला आपला एक बंदा येईल. तो तुला तेथे आवश्यक ती सर्व मदत करेल’, असे पोहचण्यापूर्वीनागपूरला निघण्यापूर्वी उमरने रसईला विश्वास दिला होता. तू ‘त्याच्या’ मदतीने तेथील गल्लीबोळाला चांगला नजरेत घालशिल, फोटो, व्हिडीओ काढशिल, असेही उमरने सांगितले होते. त्यानुसार, रईसने नागपुरात पोहचल्यानंतर उमरला संपर्क करून ‘बंदा’ कहां है, अशी वारंवार विचारणा केली. ‘तो बंदा’ मात्र पोहचलाच नाही. त्यामुळे रईस घाबरला अन् तो उमर तसेच जैशच्या म्होरक्यांना पाहिजे तसे आउटपूट देऊ शकला नाही. तिकडे जैशचे मिशन फेल झाले अन् ईकडे तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. रईसची श्रीनगरमध्ये चाैकशी सुरू आहे. मात्र, नागपुरातील ‘तो बंदा’ अद्याप स्पष्ट झालेला नाही. आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे ‘तो’बंदा शोधून काढण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे.
टेरर अटॅक अन् पाकिस्तानचे कनेक्शन२०१२ पर्यंत प्रचंड फार्ममध्ये असलेल्या भटकळ बंधूंनी इंडियन मुजाहिदिनच्या नावाने पुणे, मुंबईसह भारतातील अनेक शहरात बॉम्बस्फोट घडवून आणले. देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूरवरही त्यांची वक्रदृष्टी होतीच. रियाज भटकळला पकडून तपास यंत्रणांनी इंडियन मुजाहिदीनचे नेटवर्क पुरते तोडले. त्यानंतर लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर नागपूर आले. कधी मशिदीजवळ पाईप बॉम्ब लपवून तर कधी मोठ्या प्रमाणात आरडीएक्ससह घातक शस्त्रे घेऊन दहशतवाद्यांनी नागपुरात घातपात घडविण्याचे प्रयत्नही केले आहेत. त्यात यश न आल्याने त्यांनी ब्रम्होसच्या स्थानिक प्रकल्पातील अभियंत्याच्या माध्यमातून या प्रकल्पासह नागपुरातील महत्वाच्या तसेच संवेदनशिल स्थळांचा सचित्र डाटा मिळवला आहे. प्रत्येक वेळी घातपाताच्या या घडामोडीचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे.