लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महायुतीच्या आमदारांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. विशेष म्हणजे यंदा अजित पवार गटाच्या दोन आमदारांनी उपस्थिती लावली. गेल्यावेळी त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य संघस्थानी पोहोचला नव्हता.
हिवाळी अधिवेशन कालावधीत २०१५ सालापासून दरवर्षी संघातर्फे भाजप व मित्रपक्षांच्या आमदारांना रेशीमबाग येथे बोलविण्यात येते. मागील वर्षी अजित पवार व त्यांचे आमदार पोहोचले नव्हते, तर लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात संघ कार्यालय परिसरात गाडी पार्क केल्यावरदेखील पवार समाधिस्थळी गेले नव्हते. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या वर्षी मात्र राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे व राजकुमार बडोले हे पोहोचले. संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
सर्व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधिस्थळी नमन केले. या वर्गाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोन्हे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.
संघकार्यात सहभागी व्हा, जनतेसाठी काम करा
संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना संघकार्याबद्दल माहिती दिली. संघाचे सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे. संघाने या शताब्दी वर्षात पंचपरिवर्तनाचा नारा दिला आहे. त्या अनुषंगाने सर्व आमदारांनी देशाच्या हितासाठी कार्यरत राहावे. तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे तामशेट्टीवार यांनी सांगितले. सर्व आमदारांना संघाचा प्रवास आणि कार्य सांगणाऱ्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.