योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी माहितीच्या आदानप्रदानात काहिसा हात अखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत असून सेवाकार्यांची माहितीदेखील या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासाठी संघाच्या राष्ट्रीय सेवा भारतीतर्फे विकसित करण्यात आलेल्या विशेष ‘अॅप’ व संकेतस्थळला आता गती प्राप्त झाली आहे. या माध्यमातून सेवाकार्यांशी समाजाला जोडण्यावरदेखील भर देण्यात येत आहे.राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रभाव असलेल्या संघ व संघ परिवारातील विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणात सेवाभावी कार्य व प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र संघाकडून यांची माहिती समोर आणली जात नव्हती.तंत्रज्ञानाच्या युगात याबाबतीत संघ मागे राहू नये या विचारातून मागील वर्षीच हे ‘सेवागाथा’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. याच नावाने ‘मोबाईल अॅप’देखील विकसित करण्यात आले होते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता नियमितपणे संघाचे सेवाकार्य जगापर्यंत जात आहे. या कार्याला आता जास्त गती मिळाल्याचा संघ पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारी व गुजरातपासून ते त्रिपुरापर्यंतच्या विविध कार्यांची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत जात आहे. या माध्यमातून गरजूंपर्यंत समाजाचा मदतीचा हातदेखील पोहोचण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.
सेवाव्रतींची प्रेरणावाटया संकेतस्थळावर केवळ संघातर्फे सेवाकार्यांचीच माहिती देण्यात येत नाही तर विविध भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रतींची प्रेरणावाटदेखील जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील व विचारधारेच्या लोकांना यात स्थान देण्यात येत आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सेवाकार्य करणाऱ्यांचा संघर्ष व जिद्द वाचून लोक स्वत:हून मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. शिवाय समाजातील अनेक सकारात्मक कामांची माहितीदेखील आमच्यापर्यंत पोहोचत आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
देशभरात सुमारे पावणेदोन लाख सेवाकार्यराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा विभाग व सेवा भारतीच्या माध्यमातून देशभरात १ लाख ७४ हजार ५१९ सेवाकार्य व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यात आरोग्याशी संबंधित ८९९२६, शिक्षणाशी संबंधित २५१३६, सामाजिक क्षेत्रातील ३८९०९ तर लोकांना स्वावलंबी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या २०५४८ सेवाकार्य व प्रकल्पांचा समावेश आहे.