नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशपातळीवर विविध प्रशिक्षण वर्ग रद्द केले होते. मात्र आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्यामुळे दोन वर्षांनंतर हे वर्ग आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपुरात तृतीय वर्ष वर्गाचेदेखील आयोजन होणार असून, यावेळी मुख्य अतिथी कोण राहणार याकडे संघ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या वर्गांमधील प्रशिक्षण अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाधिष्ठित बदल होण्याची शक्यता आहे.
यावर्षी देशभरात संघातर्फे १०५ ठिकाणी वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गांच्या आयोजनासाठी ५ ते ११ एप्रिल या कालावधीत देशभरातील निवडक ७५ पदाधिकाऱ्यांची उत्तराखंड येथील हरिद्वार येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हेदेखील यावेळी उपस्थित राहतील. या बैठकीत या वर्गांमधील अभ्यासक्रम तसेच बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षणावरदेखील चर्चा होईल. दर तीन ते पाच वर्षांनंतर या अभ्यासक्रमांचा आढावा घेतला जातो व त्यात आवश्यक ते बदल केले जातात, अशी माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. यंदा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आवश्यक बदल होण्याची शक्यता आहे.
‘मिशन १ लाख’वरदेखील मंथन
या बैठकीत केवळ प्रशिक्षण वर्गच नव्हे तर संघाच्या पुढील योजनांच्या अंमलबजावणीवरदेखील चर्चा अपेक्षित आहे. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने एक लाख स्थानांपर्यंत संघ शाखा उघडण्याच्या योजनेवर चर्चा होईल. सोबतच विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांवरदेखील मंथन होईल.