नागपूर - नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजनही करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी संघाच्या गणवेशात कार्यक्रमात उपस्थित दर्शवली. पथसंचलनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील मुद्दे- हे वर्ष श्रीगुरुनानक देव यांच्या प्रकाशाचे 550 वे वर्ष आहे. त्यांच्या परंपरेने देशाच्या दीन-हीन अवस्थेला दूर करणाऱ्या दहा गुरुंची तेजस्वी मालिका दिली- महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंतीवर्ष आहे. गांधीजींनी देशाच्या स्वतंत्रतेच्या आंदोलनात सत्य व अहिंसेवर आधारित राजकीय अधिष्ठान उभे केले - शंभर वर्षांअगोदर जालियनवाला बागेत देशासाठी शहीद झालेल्या शेकडो देशबांधवांच्या बलिदान व समर्पणाचे स्मरण करत नैतिक बळाला जागृत करायचे आहे - स्वातंत्र्याच्या 71 वर्षांत देशाने प्रगतीची अनेक शिखरे गाठली आहेत. सर्वांगपूर्ण राष्ट्रीय जीवनासाठी आणखी अनेक शिखरे गाठायची आहेत - स्वार्थी तत्वांकडून विविध कुरापतींच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणण्यात येत आहेत. प्रगतीपथावर अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे - आंतरराष्ट्रीय संबंधांना ठीक पद्धतीने समजून आपल्या देशाच्या चितांशी त्यांना अवगत करवणे व त्यांचे सहकार्य मिळविणे हा प्रयत्न सफल झाला आहे - शेजारी देशांची शांतीपूर्वक संबंध बनविण्याचे प्रयत्न कायम ठेवण्यात आले. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात दृढतेने उभे राहून आपली भूमिका सेना, शासन व प्रसासनाने दाखवून दिली - सैन्य व सुरक्षादलांचे धैर्य वाढविणे, त्यांना संपन्न बनविणे, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे इत्यादी गोष्टींना प्रारंभ झाला व त्याचा वेग वाढतो आहे - सुरक्षादलांचे जवान व कुटुंबियांचे योगक्षेम कुशल रहावे यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. या दिशेने शासनाकडून काही चांगले प्रयत्न झाले आहेत - गृहमंत्रालय, सुरक्षा मंत्रालय, अर्थ मंत्रालय इत्यादी अनेक विभागांतून सुरक्षादलांशी संबंधित योजनांचा विचार व अंमलबजावणी होणे प्रशासकीय दृष्टीने आवश्यक आहे - पश्चिमी सीमेपलिकडे असलेल्या देशातील सत्तापरिवर्तनानंतर सीमाप्रदेश तसेच पंजाब, जम्मू व काश्मीर यासारख्या राज्यांतील छुप्या कुरापती कमी झालेल्या नाहीत - अंदमान-निकोबार सह इतर बेटं संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्यांच्यावर नजर तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेथील व्यवस्थेला बळ दिले पाहिजे - भूमी तसेच सागरी सीमाक्षेत्रांत राहणाऱ्या बांधवांपर्यंत रोजगार, शिक्षण, आरोग्य इत्यादींची व्यवस्था पोहोचत राहीली पाहिजे यासाठी शासन व समाज या दोघांनीही प्रयत्न वाढविले पाहिजे - सुरक्षा उत्पादनांबाबत देशाची संपूर्ण आत्मनिर्भरता साधल्याशिवाय देशाच्या सुरक्षेसंदर्भात आश्वस्त होऊ शकत नाही. या दिशेने देशाच्या प्रयत्नांचा वेग वाढवावा लागेल - देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे - समाजातील त्रुटींना दूर करुन त्याचा शिकार झालेल्या समाजातील बांधवांना स्नेह व सन्मानाने जवळ घेऊन समाजात सद्भावपूर्ण व्यवहार वाढवावा लागेल
- अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गांसाठी बनलेल्या योजना योग्य पद्धतीने लागू व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाने अधिक तत्परता व पारर्शकता बाळगण्याची आवश्यकता आहे. - अंतर्गत सुरक्षेत पोलिसांची मौलिक भूमिका असते. त्यांच्या अवस्थेत सुधारणेची शिफारस पोलीस आयोगाने केली आहे. त्यावर विचार व सुधारणेच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.- देश व समाजातर्फे दुर्बल घटकांसोबत झालेल्या व्यवहारात अनेक त्रुटी राहून जातात. त्यामुळे या वर्गाच्या मनात विद्रोह, द्वेष व हिंसेची बीज रोवणे सोपे होऊन जाते. - देशविरोधी तत्व दुर्बलांसोबत कपट करतात. यातूनच मागील चार वर्षांत समाजात काही अप्रिय घटना घडल्या व आंदोलनांना विशिष्ट रुप देण्याचा प्रयत्न झाला.- येणाऱ्या निवडणूकी डोळ्यासमोर ठेवून समाजात फुटीरता, हिंसा, द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे - ”भारत तेरे टुकड़े होंगे“ अशा घोषणा ज्या समूहांतून आल्या, त्यांचेच प्रमुख चेहरे अप्रिय घटनांमध्ये प्रमुखतेने आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून समोर आले - वन व दुर्गम क्षेत्रात दाबण्यात आलेल्या हिंसात्मक कारवायांचे कर्तेकरविते व पोषणकर्ते आता शहरी माओवादाला ढाल बनवत आंदोलनांत समोरच्या रांगांमध्ये दिसतात - नवीन अपरिचित, अनियंत्रित, केवळ नक्षली नेतृत्वाशी बांधल्या गेलेला अनुयायी व खुले पक्षपाती नेतृत्व स्थापित करणे हीच या शहरी माओवाद्यांची नवी कार्यपद्धती आहे- शहरी माओवाद्यांची रचलेल्या जाळ्याचा सर्व घटनाक्रम केवळ विरोधकांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशविदेशांतील भारतविरोधी शक्तींच्या मदतीने रचण्यात आलेले मोठे षडयंत्र आहे - शहरी माओवाद्यांच्या षडयंत्रात राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती किंवा समहू, दुर्बल वर्ग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी ओढण्यात येत आहे - शहरी माओवाद्यांकडून देशात विषारी वातावरण बनवून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे - शासन-प्रशासनाची सजगता व समाजाचा आश्रय न मिळाल्याने हे उपद्रवी तत्व संपून जातील. प्रशासनाला आपल्या सूचना प्रणालीला व्यापक व मजबूत करावे लागेल - पंथ-संप्रदाय, जाती-उपजाती, भाषा, प्रांत इत्यादींच्या विविधतेला आपण एकतेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. विविध वर्गांच्या समस्या स्वतःची जबाबदारी मानून तोडगा काढला पाहिजे- नागरिकांनी कायदा व संविधान यांच्या मर्यादेत रहायला हवे. आपले राजकारणी तसेच प्रत्येक व्यक्तीला पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे नेहमी स्मरण केले पाहिजे - समाजाच्या आत्मीय एकात्मतेची भावना ही देशात स्थिरता, विकास व सुरक्षेची गॅरन्टी आहे. हे संस्कार नवीन पिढीला लहानपणापासूनच घर तसेच शिक्षणातून मिळाले पाहिजे.- शैक्षणिक अभ्यासक्रमांत पायाभूत सुसंस्कारांचा अभाव झाला आहे. शिक्षणाचे नवीन धोरण प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत वेळ हातातून निघून चालली आहे- नवीन युगात जे चांगले आहे ते खुल्या मनाने आत्मसात करत अभद्र गोष्टींपासून वाचण्यासाठी नवीन पिढीत विवेक निर्माण करावा लागेल. - देशेतील कौटुंबिक वाद, कर्जबाजारीपणा, जवळच्या व्यक्तींकडून होणारे व्यभिचार-बलात्कार, आत्महत्या तसेच जातीय संघर्ष व भेदभावाच्या घटना वेदनादायी व चिंताजनक आहेत- आत्मीयतापूर्व कौटुंबिक वातावरण व सामाजिक सद्भावना निर्माण करण्यातूनच समाजातील समस्यांवर तोडगा निघेल. यादृष्टीने समाजाला या दिशेने कर्तव्यरत व्हावे लागेल - आपली प्रत्येक कृती, उक्ती व मनातूनच व्यक्ती, कुटुंब, समाजाचे सुपोषण झाले पाहिजे. हे समाजाला दिशा दाखविणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे - शेकडो वर्षांपासून चालत आलेली व समाजाने स्वीकार केलेली परंपरा असते. शबरीमला देवस्थानसंबंधी निर्णयात त्याचे स्वरुप व कारणांचा विचारच करण्यात आला नाही.
- आपल्या प्रकृती स्वभावात स्थिर राहूनच देश प्रगत होतो, कुणाचे अंधानुकरण केल्याने नाही.
- पक्षीय राजकारण, जातीसंप्रदायांच्या प्रभावाचे राजकारण यापासून संघ सुरुवातीपासूनच दूर राहत आला आहे व पुढेदेखील दूरच राहणार - संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक मोठ्या संख्येने नागरिक म्हणून कर्तव्य पूर्ण करुन राष्ट्रहिताच्या पक्षात आपली शक्ती उभे करतील. हे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक कार्य आहे. - हिंदू शब्दापासून घाबरणाऱ्या समाजातील नागरिकांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की हिंदुत्व देशाचा सनातन मूल्यबोधाला म्हणतात
कैलाश सत्यार्थी यांच्या भाषणातील मुद्दे
- देशात मुलींची जनावरांहून कमी किमतीत खरेदी विक्री होते ही दुर्दैवाची बाब.
- संवेदनशील, समावेशी, सुरक्षित, स्वावलंबी, स्वाभिमानी भारताच्या निर्माणाचे सामर्थ्य पाहतो.
- आधुनिक काळात व्हर्चुअल रिऍलिटी वेगाने वाढते आहे. मात्र तंत्रज्ञान कुठे घेऊन जात आहे ? शिक्षक, डॉक्टर, यांची भूमिका नाममात्र होईल.
- समाज सुरक्षा, वातावरण, विश्वास यांच्या शिवाय राष्ट्र निर्माण शक्य नाही. सीमा सुरक्षेसोबतच अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची आहे.
- आपली मुले, महिला घरी, शाळा, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नाहीत. हा भारतमातेचा अपमान आहे.
- मौन बाळगणे एक प्रकारे हिंसाच असते .
- तरुणाईने आलोचक न बनता सांस्कृतिक शक्ती ओळखली पाहिजे.
- संघाने भारताचे वर्तमान व भविष्य वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा.