नागपूर : देशातील व समाजातील वर्तमान राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थितीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुण्यात मंथन करण्यात येणार आहे. १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत संघातर्फे अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या समवेत संघ धुरीण उपस्थित राहणार आहेत.
संघातर्फे नियमितपणे संघ परिवारातील विविध संघटनांच्या राष्ट्रीय पातळीवरील समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र सध्या देशातील राजकीय व सामाजिक स्थिती, तसेच संघाच्या स्थापनेला होणारे १०० वर्ष या पार्श्वभूमीवर यंदाच्या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. या बैठकीत संघ परिवारातील ३६ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.
यात राष्ट्रसेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्याभारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती यासारख्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत वर्तमान स्थिती सोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, संघाचे विविध सेवा प्रकल्प, देशातील आर्थिक मुद्दे, राष्ट्रीय सुरक्षा व सामाजिक विषयांवर मंथन होईल अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.