आनंद डेकाटे नागपूर : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी व बालकांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अंतिम मुदतवाढीची दखल सर्व शाळा, पालक व सर्व सामाजिक संस्थांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांनी केले आहे.