आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारोना विषाणूच्या प्रादुर्भावाला पायबंद घालण्याकरिता शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विविध कार्यक्रम तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या शासनाकडून सूचना करण्यात आल्या आहे. अशातच आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी प्रक्रियाही यावर्षी हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रही पाठविण्यात आले आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२०-२०२१ करिता राज्यभरात ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. ११ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतून २ लाख ९५ हजार २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजतापासून दुपारी ४ वाजतापर्यंत लॉटरी प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्यावर्षी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुण्यातून सर्वांचीच एकाच ठिकाणाहून लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉटरी प्रक्रिया हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित राहावे तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असेही सूचित करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी पत्राद्वारे कळविले आहे.राज्यात १ लाख १५ हजार २९८ जागा रिक्तराज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा वगळता) शाळांमध्ये नर्सरी व पहिलीमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के कोट्यांतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. यामध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील ९ हजार ३३१ शाळा सहभागी झाल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये १ लाख १५ हजार २९८ जागा रिक्त असून त्याकरिता २ लाख ९५ हजार २२३ ऑनलाईन तर १३ मोबाईलद्वारे असे एकूण २ लाख ९५ हजार २३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. रिक्त जागांपेक्षा दुप्पट अर्ज प्राप्त झाल्याने कुणाला संधी मिळते, हे लॉटरीनंतरच कळणार आहे.
पालकांनी मेसेजवर अवलंबून राहू नयेआरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२०-२०२१ करिता १७ मार्चला लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी लागल्याचे किंवा प्रतीक्षा यादीत नाव असल्याचे मेसेज पालकांना १९ मार्चला दुपारनंतर प्राप्त होतील. पण, पालकांनी केवळ मॅसेजवर अवलंबून राहू नये. त्यांनी संकेतस्थळावरील अप्लिकेशनवाईज डिटेल्स यावर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली अथवा नाही ते पाहावे, असेही कळविण्यात आले आहे.