लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीईसाठी आतापर्यंत ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा शाळेच्या नोंदणीची संख्या वाढली आहे. शाळांची नोंदणी वाढली असली तरी, आरक्षित जागा घटल्या आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यात आरटीईच्या प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी एकुण ६८० शाळांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षी ६८० शाळेत ६ हजार ६८५ जागा आरटीईसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु यंदा ६८१ शाळेतून केवळ ५६०० जागा आरक्षित केल्या आहेत. आरटीईच्या वेळापत्रकानुसार ८ फेब्रुवारीला शाळांच्या नोंदणीची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, त्याला दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा मुदतवाढ दिली असून आतापर्यंत ६८१ शाळांनी नोंदणी केली आहे. नोंदणीच्या प्रक्रियेत पुन्हा शाळा वाढतील, अशी अपेक्षा शिक्षण विभागाला आहे.