नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांना बनावट लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती दाखवून विद्यापीठाचे माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. धर्मेश धवनकरांनी त्यांच्याकडून लाखाेंची खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार आहे. अजय चिंतामण चाफले हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
लैंगिक छळाची तक्रार मिळाल्याची आणि ते निपटविण्यासाठी खर्च लागेल, असे सांगून धर्मेश धवनकरांनी आपणाकडून लाखाे रुपये खंडणी वसूल केल्याचा आराेप विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांनी केला आहे. याबाबत त्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली हाेती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने प्रवीणा खोब्रागडे यांच्या समितीची नेमणूक केली होती. मात्र, खोब्रागडे यांनी समितीतून माघार घेतल्याने ॲड. सुमित जोशी यांच्यामार्फत चौकशी केली जाणार होती. विभागप्रमुखांबद्दल असलेल्या कथित लैंगिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी चौकशी समितीला पैसे द्यावे लागतील, असे सांगून डॉ. धवनकर यांनी पैसे घेतले होते आणि या समितीत ॲड. सुमित जोशी यांचा समावेश होता. असे असताना आता डॉ. धवनकर यांची चौकशी करणे उचित ठरणार नाही, असे कारण देऊन ॲड. जोशी यांनीही माघार घेतली आहे.
त्यामुळे आता निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांची समिती नेमण्यात आली आहे. चाफले हे विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीचे सदस्य होते. यवतमाळहून जिल्हा न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे नागपूर विद्यापीठाने या प्रकरणात डॉ. धर्मेश धवनकरांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.