नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ परीक्षा १५ मे पासून प्रारंभ होणार आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २२ मे २०२३ पासून होणार असून परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील ४ ही जिल्ह्यात याकरिता १२७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहे. पदव्युत्तर पदवी करिता १९ हजार तर पदवी परीक्षा करिता १ लाख ५ हजार असे एकूण १ लाख २६ हजार विद्यार्थी उन्हाळी परीक्षा करिता प्रविष्ठ होणार आहेत.
पदवी अभ्यासक्रमाच्या तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे, आठवे, नववे व दहावे सेमिस्टर / वार्षिक पॅटर्न आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तिसरे व चौथे सेमिस्टर / सर्व पदविका या परीक्षांच्या वेळापत्रकाचा यामध्ये समावेश आहे. या सर्व पदवी पदव्युत्तर परीक्षांच्या नियमित, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र ऑनलाईन सादर करण्याकरिता (प्रो मार्क) Nagpur.University लिंक सुरू केली आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून उन्हाळी २०२३ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या तब्बल ३७१ परीक्षा घेतल्या जाणार आहे. परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ६ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र ८ मे पर्यंत विद्यापीठात न चुकता जमा करावे लागणार आहे. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त होणारे परीक्षा आवेदन पत्र विलंब शुल्क आकारून स्वीकारण्यात येतील.
विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण तसेच नोकरी करिता सुविधा व्हावी म्हणून अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा ३० मे पर्यंत संपतील असे नियोजन करण्यात आले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल १५ जून पर्यंत लागतील असे नियोजन विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले जात आहे.