नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयात यंदा पदवी अभ्यासक्रमाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) प्रवेश दिले जातील. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेश कार्यक्रम जाहीर केला आहे.
पदवी स्तरावरील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ ते ३ जुलै २०२३ पर्यंत विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना सर्व कागदपत्रे अपलोड करावयाची आहे. त्यानंतर झालेल्या नोंदणीची प्रिंट आऊट घेऊन ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या ठिकाणी १५ जून ते ५ जुलै २०२३ पर्यंत महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासोबत नोंदणीची प्रत सादर करावयाची आहे. महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर विद्यापीठाने दिलेल्या एकरूप वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवून गुणवत्ता यादी तयार करून विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून कागदपत्रे अपलोड केल्याची खातरजमा केल्याशिवाय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश निश्चित होण्यास पात्र ठरणार नाही.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया
अव्यावसायिक महाविद्यालयातील पदवी (यूजी) स्तरावरील अभ्यासक्रमात प्रथम वर्षामध्ये प्रवेश प्रक्रिया १५ जून २०२३ पासून आरंभ होत आहे. १५ जून ते ३ जुलै २०२३ दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. महाविद्यालयांमध्ये सोमवार दिनांक १२ जून पासून माहितीपत्रक विक्रीस उपलब्ध करून दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर प्रवेश घ्यावयाच्या संबंधित महाविद्यालयांमध्ये १५ जून २०२३ ते ५ जुलै २०२३ दरम्यान प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहे. संबंधित महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता व प्रतीक्षा यादी ८ जुलै २०२३ प्रकाशित केली जाणार आहे. गुणवत्ता यादी नुसार १० जुलै ते १५ जुलै २०२३ दरम्यान प्रवेश निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश १७ जुलै ते २० जुलै २०२३ दरम्यान पूर्ण केले जातील. आवश्यकता पडल्यास कौन्सिलिंग आणि स्पॉट ऍडमिशन प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविली जातील.
संलग्नित महाविद्यालयांमध्ये घ्यावा प्रवेश
सदर महाविद्यालयास २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यापीठाचे संलग्नीकरण आहे. याची हा खातरजमा करूनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. संलग्निकरण झालेल्या महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. संलग्निकरण नसलेल्या महाविद्यालयात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेऊ नये. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकाच विद्याशाखेत दोनदा नोंदणी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ राजू हिवसे, उपकुलसचिव डॉ. रमण मदने यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक -
१) विद्यापीठ संकेतस्थळावर नोंदणी - १५-६-२०२३ ते ३-७-२०२३
२) माहिती पुस्तकांची विक्री - १२ ६-२०२३ पासून
३) महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज स्वीकारणे -१५-६-२०२३ ते ५-७-२०२३
४) गुणवत्ता व प्रतीक्षा यादी जाहीर - ८-७-२०२३
५) गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश - १०-७-२०२३ ते १५-७-२०२३
६) प्रतीक्षा यादीतील प्रवेश - १७-७-२०२३ ते २०-७-२०२३
७) कौन्सिलिंग व स्पॉट ऍडमिशन - ७-८-२०२३ पर्यंत