नागपूर : प्रा.मोहन काशीकर यांच्यावरील सर्व प्रकारची वादग्रस्त कारवाई रद्द करण्याचे आदेश रेकॉर्डवर सादर करण्यात अपयश आल्यामुळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची माफी मागितली, तसेच यापुढे अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली.
डॉ.चौधरी यांनी संबंधित आदेश न्यायालयात सादर करण्याचा शब्द दिला होता, परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही. याकरिता न्यायालयाने त्यांना फटकारले. त्यामुळे डॉ.चौधरी यांनी न्यायालयाची माफी मागितली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, त्यांना माफ केले. त्यासोबतच डॉ.चौधरी यांच्या बेकायदेशीर कृतीची कुलपतींकडे तक्रार करण्याची काशीकर यांना मुभा दिली व काशीकर यांच्या वेतनातून कापण्यात आलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुखपदी कार्यरत असताना काशीकर यांच्याकडे ९ सप्टेंबर, २०२० रोजी मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला होता, परंतु काशिकर यांनी वैयक्तिक कारणांमुळे ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. परिणामी, डाॅ.चौधरी यांनी चिडून ३१ जुलै, २०२१ रोजी इतिहास विभागातील प्रा.डॉ.श्यामराव कोरेटी यांची पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती, तसेच ३ ऑगस्ट, २०२१ रोजी काशीकर यांच्याविरुद्ध गैरवर्तणुकीचे आरोप निश्चित करून विभागीय चौकशीचे निर्देश दिले होते. त्याविरुद्ध काशीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काशीकरतर्फे ॲड.फिरदौस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.