नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या वादग्रस्त कारकीर्दीबाबत चौकशी समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या खुलाशानंतर कुलगुरू डॉ. चौधरी यांनी खुर्ची धोक्यात दिसत आहे. कुलगुरूंवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे राज्यपाल कार्यालयाकडून कळाले, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामांबाबत चौकशी करण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सखोल चौकशी केली असून, यामध्ये कुलगुरू दोषी असल्याचे दिसून आले. मात्र, राज्य सरकार कुलगुरूंवर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे हा संपूर्ण अहवाल आणि त्याचा शिफारशी राज्यपालांकडे पाठविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली असून, त्यांनीही कारवाई सुरू केली असल्याची माहिती दिल्याचे पाटील म्हणाले.
एमकेसीएलला निविदा प्रक्रियेशिवाय दिलेल्या कामाचा अहवालदेखील राज्यपालांकडे देण्यात आला आहे. याशिवाय अन्य आणखी काही बाबी असल्यास समिती नेमण्यात येईल आणि त्याची चौकशी करून राज्यपालांना अवगत करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
- कुठल्या कलमानुसार कारवाई होणार
चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले की, राज्य सरकार कारवाई करू शकत नाही. हे सर्व अधिकार कुलपती म्हणून राज्यपालांना आहेत. विद्यापीठ कायद्याच्या कलम ११ (१४ ड ) नुसार ही कारवाई केली जाते. त्यापूर्वी आरोपपत्र जमा केले जाते आणि त्यानंतर कारवाई हाेते.