लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हीआयपी’ कोट्यातून गैरप्रकाराने शिकाऊ वाहन परवाना दिल्याचा ठपका ठेवत शहर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याने सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यासह आठ दलालांवर गुन्हे नोंदविले आहे. या घटनेने आरटीओ क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात ‘व्हीआयपी’ कोट्यातून सुमारे सव्वा लाख परवाने देण्यात आले. परंतु कारवाई केवळ नागपुरातच होत आहे. यामुळे उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.वाहन परवानाला आवश्यक असलेल्या ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’साठी लागणारा कालावधी, यामुळे लोकांचा वाढात रोष, यावर उपाय म्हणून कार्यालयीन वेळेच्या आधी आणि नंतर व आवश्यक तेथे सुटीच्या दिवशी चाचणीचे कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिले होते. ज्या उमेदवाराला मुदत संपणाऱ्या तारखेनंतर अपॉईंटमेन्ट मिळत असेल अशा उमेदवारांना गैरहजर राहणाऱ्यांच्या जागी समायोजित करण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या. अशा उमेदवारांना ‘व्हीआयपी’ कोट्यातून परवाना देणे सुरू झाले. जून २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत राज्यात सुमारे सव्वा लाख परवाने ‘व्हीआयपी’ कोट्यातून देण्यात आले. नागपुरातील सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यांसह आठ दलालांनी हे परवाने देताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबत सायबर सेलने आपला अहवाल सादर केला. अहवाल प्राप्त होऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याचीही तक्रार दाखल झाली. याची दखल परिवहन आयुक्तांनी घेतली. त्यांनी शहर आरटीओ कार्यालयाला संबंधितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे पत्र दिले. आरटीओ कार्यालयाने या संदर्भातील एक पत्र सीताबर्डी पोलीस ठाण्याला दिले. परंतु आरटीओने फिर्यादी म्हणून कुणालाच समोर केले नव्हते. यामुळे दोन दिवस होऊनही गुन्हे दाखल झाले नव्हते. अखेर शुक्रवारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला फिर्यादी म्हणून सादर केल्याने सीताबर्डी पोलीस ठाण्याने रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.
आरटीओ : सात सहायक निरीक्षकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:21 PM
‘व्हीआयपी’ कोट्यातून गैरप्रकाराने शिकाऊ वाहन परवाना दिल्याचा ठपका ठेवत शहर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याने सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यासह आठ दलालांवर गुन्हे नोंदविले आहे.
ठळक मुद्देव्हीआयपी कोट्यातील शिकाऊ वाहन परवाने प्रकरण