सूचनेनंतरही वाहनावर अंबर दिवा कायम : ३३ वाहनांवर कारवाईनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंग व रेल्वेचे सहायक विभागीय सुरक्षा अधिकारी यांच्या वाहनांवर अंबर दिवा दिसून येताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने, या दोन्ही अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोबतच सात दिवसात आरटीओकडून या वाहनाची तपासणी करून घेण्याचीही सूचना केली आहे.शासकीय, निमशासकीय अधिकारी व घटनात्मक दर्जा प्राप्त पदाधिकाऱ्यांच्या वाहनाच्या टपावर दिवा लावण्याच्या संदर्भात गृह विभाग (परिवहन) मंत्रालयाने सुधारीत अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आरटीओ, शहर कार्यालयाने पुन्हा एकदा मंगळवारपासून वाहन तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांनी सांगितले, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९चे नियम १०८ (१) व ११९ भंग करून वाहनावर दिवा वापरत असलेल्या दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचे वाहन क्र. एम.एच.३१ डीझेड १०० व रेल्वेचे सहायक विभागीय सुरक्षा अधिकारी यांचे वाहन क्र. एम.एच.३१ सीएएन ७५६४ वरील अंबर दिवा काढण्याची सूचना या पूर्वी देण्यात आली होती. परंतु आज त्यांच्या कार्यालयाच्यासमोर ही दोन्ही वाहने अंबर दिव्यासह उभी होती. हे वाहन रस्त्यावर असते तर जप्त करण्यात आले असते, परंतु वाहन उभे असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या शिवाय वाहनावरील दिवा काढल्याचा पुरावा म्हणून सात दिवसांत आरटीओ कार्यालयात संबंधित वाहन दाखविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. वाहनावरील दिवा तपासणीच्या मोहिमेत आतापर्यंत ३३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने मागील काही दिवसांपासून कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणारे स्वत:च सतर्क झालेलेही दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)
डीआरएमला आरटीओची नोटीस
By admin | Published: July 24, 2014 1:01 AM