नागपूर : परराज्यात ऑक्सिजन टँकरची मागणी वाढल्यामुळे राज्यातील काही टँकर विनापरवानगी परराज्यात व्यवसायासाठी जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे राज्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याला गंभीरतेने घेत परिवहन विभागाने या टँकरच्या वाहतुकीवर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या वाढताच ऑक्सिजनची मागणीही वाढली. राज्यातील उपलब्ध नायट्रोजनचे टँकरसुद्धा ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी परावर्तित करण्यात आले आहेत. गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, ओदिशामधील प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. राज्यातून कोल्हापूर ते गोवा व नागपूर ते मध्य प्रदेश अशा केवळ दोन ठिकाणी महाराष्ट्रातून ऑक्सिजन टँकर बाहेर नेण्यास परवानगी आहे. परंतु, आता परराज्यातही ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे राज्यातील काही टँकर विनापरवानगी परराज्यात व्यवसायासाठी जात असल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील सीमा तपासणी नाक्यावरून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक ऑक्सिजन टँकरची माहिती नोंदवहीत नोंद करण्याच्या सूचना परिवहन विभागाने संबंधित आरटीओ कार्यालयांना दिल्या आहेत. सोबतच ऑक्सिजन टँकर राज्यातील सक्षम प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे परराज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी जात असल्याची खात्री करण्याचे, कोणत्याही स्थितीत टँकर त्वरित मार्गस्थ करण्याचे, कोणतीही तपासणी न करण्याचे व टँकरचालकाची विचारपूस करून त्याला काही अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.