नागपूर : रेती चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांवर ‘आरटीओ’ने कारवाईचा धडाका सुरू केला. पहिल्याच दिवशी या वाहनांवर कारवाई करीत ६० हजारांचा दंड वसूल केला. उमरेड पोलिस व ग्रामीण एलसीबीनेही कारवाईची मोहीम हाती घेतल्याने अवैध रेती वाहतूक चालकांचे धाबे दणाणले आहेत.
चंद्रपुरातून काम्पा, शंकरपूर, भिसी मार्गे नागपुरात येत असलेल्या विनानंबरप्लेटचे रेतीचे शेकडो डब्ल्यूआर ट्रकच्या कारवाईकडे वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केले. याची दखल घेत नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली. सायंकाळपर्यंत १० वर जडवाहनांची तपासणी केली. यातील दोषी दोन ओव्हरलोड रेतीच्या वाहनांवर ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आरटीओ अधिकाऱ्यांनुसार जडवाहनांची नियमित तपासणी सुरू असते; परंतु या तपासणीला आणखी गती देण्यात येईल. नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
५,५१५ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई
नागपूर शहर आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत १,१७४ तर नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून याच कालावधीत ४,३४२ असे एकूण ५,५१५ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात शहर आरटीओ कार्यालयाला १ कोटी ८ लाख तर ग्रामीण आरटीओला ३ कोटी ७४ लाख असे एकूण ४ कोटी ८२ लाखांचा महसूल प्राप्त झाला. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
उमरेड पोलिस स्टेशन व एलसीबीची संयुक्त कारवाई
‘लोकमत’ने सलग तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून होत असलेल्या रेतीचोरीच्या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर उमरेड पोलिस व ग्रामीण एलसीबीने संयुक्तपणे उमरेड ते नागपूर मार्गावर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे जडवाहन मालकांमध्ये दहशत पसरली आहे. रेतीच्या ट्रकांची संख्या कमी झालेली दिसली. लोकमतच्या वृत्तामुळे पोलिस प्रशासन अलर्ट झाले असून, उमरेड-नागपूर मार्गावर कारवाईला वेग आला आहे.