नागपूर : राजधानी मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आरटीओतील निवृत्त अधिकारी लक्ष्मण खाडे उपराजधानीत येऊन गेले. तत्पूर्वी त्यांनी तसेच त्यांच्या एका सहकाऱ्याने येथील एका महिला आरटीओला फोन करून बदलीपात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची लिस्ट पाठवून त्यांना भेटीला बोलावून घेतले. बुधवारी झालेल्या या अर्थपूर्ण घडामोडीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आरटीओत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लीप पुढे आल्याने राज्यातील परिवहन विभागात भूकंपासारख्या वातावरणाचे संकेत मिळाले आहेत.
खाडेंच्या नागपूर वारीत सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये बदलीपात्र अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. पाहिजे तेथे बदली करून देण्यासाठी सत्तापक्षातील शीर्षस्थ नेत्यांच्या नावाने कोट्यवधींची डील झाल्याचीही चर्चा आहे. ‘लोकमत’ने या संबंधाने गुरुवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर मध्यस्थांची भूमिका वठविणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचे दुसऱ्या एकासोबत झालेले संभाषणही पुढे आले आहे. होळी - धूळवडीच्या दुसऱ्या दिवशी ‘खाडेंच्या भेटीला जाऊन गाठी देण्या - घेण्याचा प्रयत्न’ झाल्याचे त्यातून पुढे आले आहे. ‘लोकमत’च्या हाती ही खळबळजनक ऑडिओ क्लीप लागली असून, सव्वाचार मिनिटांच्या या क्लीपमधील संभाषण पुढीलप्रमाणे आहे.
राजू : गुड मॉर्निंग मॅडम.
मॅडम : गुड मॉर्निंग राजू.
राजू : आज खाडेसाहेब येणार आहेत का?
मॅडम : हो, आज येणार आहेत. जे जे बदलीपात्र आहेत, त्या सगळ्यांना बोलवलं त्यांनी.
राजू : कधी येणार? किती वाजता येणार आहेत?
मॅडम : ११ वाजता.
राजू : ११ वाजता लॅण्ड आहेत का?
मॅडम : नाही, काही तरी ते १० वाजता येणार आहेत. मला काय म्हणायचंय, मी काल परिक्षितला पण फोन केला. त्याने काय उचलला नाही. त्यांच्याकडे काय आलं का बदल्यांचं?
राजू : कुणाकडे, खाडे साहेबांकडे?
मॅडम : हां...
राजू : तुम्हाला माहिती मॅडम...
मॅडम : नाही रे, ते त्या दिवशी गेले, त्यानंतर आताच फोन आला. डायरेक्ट काल रात्री. म्हणले, उद्या आहेस ना गीता, म्हणले... आहे साहेब. मी येतोय म्हटले. मी म्हटलं या... मग नंतर त्यांनी मला नावे पाठवली बदलीपात्रची. मग मला तुषारीचा फोन आला. की असं असं आहे, बदलीवाल्यांना बोलावलंय म्हटलं. हा म्हटलं. मी नाही कुणाला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की तू सांग, सगळ्यांना म्हणून... जे जे आहेत ते. मी म्हटलं मी नाही सांगत कुणाला. तुम्ही सांगा कुणाला सांगायचं. मग रात्री संकेतला फोन केला. तर तो म्हटला की, मला पण आताच सांगितलं त्यांनी. तो नाही आहे ना... मला यायला चार वाजतील म्हणून सांगितलं त्यानं सायबाला. असं झालं. तुला कधी कळालं?
राजू : मला आता कळालं.
मॅडम : हो का, मला काल कळालं. त्यानंतर मी सायबांना पण केला फोन; पण त्यांनी काही उचलला नाही फोन; पण कन्फर्म आहे का, काहीच माहिती नाही. बघू आता आल्यानंतर. बोलवलं त्यांनी ११ वाजता, तू जाणार आहेस?
राजू : बघतो, आता विचार करतो. ड्युटी कधी आहे? दुपारी २ नंतर.
मॅडम : ...मग ये ना... जाऊ आपण ११ वाजता. काल गायकवाड साहेब गेलते डीकेंना भेटायला. साहेब खूप चिडले होते, त्याच्यावर पण. पाटीलला काय आहे, चव्हाण साहेबांनी मेमो काढला का? ठीक आहे. तू ये मग ११ वाजता. मला फोन कर. सेंटर पॉईंटला थांबणार आहेत ते.