लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील फूटपाथ, रस्ते व आठवडी बाजारातील अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. फूटपाथ व रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी व रविवारी शहरातील आठवडी बाजारातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली, तर काही ठिकाणी बाजारच भरले नाही. ही कारवाई योग्य असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे महापालिकेतील विरोधकांनी या कारवाईला विरोध दर्शविला आहे. नैसर्गिक बाजार ही लोकांची गरजच आहे. महापालिकेने आठवडी बाजारांना जागा उपलब्ध केलेली नाही. हॉकर्स झोन निर्माण केलेले नाही. सर्वेक्षण केलेले नाही. कारवाईमुळे शहरातील एक लाख लोकांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही कारवाई बेकायदेशीर असून केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अतिक्रमण कारवाईच्या मुद्यावरून मनपातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.बाजारांवरील कारवाई बेकायदेशीर - गुडधेशहरात लोकसंख्येच्या आधारावर नैसर्गिक बाजार आवश्यकच आहेत. महापालिकेने विकास आराखड्यानुसार बाजारासाठी जागा उपलब्ध करणे अपेक्षित होते. केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन)अधिनियानुसार फेरीवाल्यांना संरक्षण प्राप्त आहे. शहरात हॉकर्स झोनची निर्मिती व शहर विकास आराखड्यानुसार आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून टाऊ न वेंडिंग कमिटी गठित क रणे आवश्यक आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शहरातील फेरीवाले व भाजीविक्रे त्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. यामुळे एक लाख लोकांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने आठवडी बाजार व फेरीवाल्यांच्या विरुद्ध सुरू केलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत केली.यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. भाजी विक्रेते व हॉकर्स विरोधातील कारवाई थांबवावी, यासाठी पालकमंत्री नितीन राऊ त यांनाही विनंती करणार आहे. आठवडी बाजार व हॉकर्स विरोधात अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई सुरू आहे. महापौर संदीप जोशी यांनी शहरातील शहरातील सर्व अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली आहे. तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर याला गती मिळाली आहे.सभागृहाच्या निर्णयानुसार कारवाई होत आहे. फेरीवाल्यामुळे शहराचे विदु्रपीकरण होत आहे असा प्रचार केला जात आहे. वास्तविक कायद्यानुसार प्रत्येकाला उपजीविकेसाठी व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवून आठवडी बाजराला जागा उपलब्ध करणे, हॉकर्स झोन निर्माण करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु अशी कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता आठवडी बाजार व हॉकर्सं विरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला. यावेळी नगरसेवक कमलेश चौधरी, स्नेहा निकोसे उपस्थित होते.जो पर्यंत नोंदणी व परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण न करताच अतिक्रमणाच्या नावावर कारवाई करणे चुकीचे आहे. पोलिसांनाही यात कारवाईचे अधिकार नाहीत. फेरीवाले व बाजारातील विक्रे त्यांवर बेकायदेशीर कारवाई केल्यास या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रफुल्ल गुडधे यांनी दिला.महापौरांनी टॉक विथ हॉकर्स घ्यावामहापौर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वॉक अॅन्ड टॉक उपक्रम सुरू केला आहे. शहरातील हॉकर्स व भाजीविक्रे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांनी टॉक विथ हॉकर्स उपक्रम राबवावा, असे आवाहन गुडधे यांनी केले. भाजी विक्रेते व फेरीवाल्यांनी कारवाईला घाबरू नये असे आवाहनही त्यांनी केले.मनपाची अतिक्रमण कारवाई कायदेशीरच -जोशीशहरात २४ नोव्हेंबरपासून वॉक टॉक वूथ मेअर, १८४ एनजीओ सोबत ब्रेकफास्ट, ७२ ज्येष्ठ नागरिक मंडळांशी चर्चा केल्यानंतर यात प्राप्त झालेल्या तक्रारी नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार महापालिका सभागृहात घेण्यात आलेला निर्णय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील फूटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. शहर चांगले व्हावे, बाजाराला शिस्त लागावी. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी अतिक्रमण कारवाईचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम हाती घेण्यापूर्वी कायदेविषयक सल्लागारांचे मत जाणून घेतले. नियमानुसार कारवाई केली जात आहे. अतिक्रमणाच्या बाजूने की कारवाईच्या विरोधात उभे राहायचे हा प्रत्येकाला अधिकार आहे. मनपाच्या इतिहासात प्रथमच अतिक्रमणावर बैठक घेण्यात आली. आम्ही आठवडी बाजारांच्या विरोधात नाही. परंतु रस्ते व फूटपाथ मोकळे झाले पाहिजे. लंडन स्ट्रीट व बुधवार बाजारात रस्त्यावर विक्रेते बसतात. हॉकर्स झोन निर्माण करण्यात यश आले नाही. दोन-तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. रस्ते, फूटपाथ व सरकारी जागा मोकळ्या व्हाव्यात ही भूमिका आहे.गुडधेंनी टॉक विथ हॉकर्सचे आयोजन करावेशहरातील हॉकर्स व भाजीविक्रे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांनी टॉक विथ हॉकर्स उपक्रम राबवावा,असे आवाहन प्रफुल्ल गुडधे यांनी केले आहे. गुडधे यांनी याचे आयोजन करावे. आयुक्तांसह मी या उपक्रमाला उपस्थित राहील अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली.एनडीएस पथकाची हप्तावसुली थांबवा- विकास ठाकरेअतिक्रमणाच्या नावाखाली महापालिकेने गठित के लेले उपद्रव शोध पथक(एनडीएस) नागरिकांकडून हप्ता वसुलीसाठी नागरिकांना वेठीस धरत आहे. रस्त्याच्या बाजूला रेती, गिट्टी ठेवली, दुकानाच्या आजूबाजूला प्लास्टिक पिशवी आढळून आली की, पाच हजारांचा दंड आकारण्याची धमकी देतात. एनडीएस पथकात नियुक्त करण्यात आलेले माजी सैनिक पोलीस अधिकारी असल्याचे भासवून कारवाईचा धाक दाखवतात. चार दिवसापूर्वी त्रिमूर्ती परिसरातील एका व्यक्तीकडून रेती ठेवली म्हणून ५ हजार घेऊन गेले. मनीषनगर, सुभाषनगर, गोकुळपेठ या भागातही अशीच वसुली सुरू आहे. मंगळवारी त्रिमूर्ती नगर येथे पुन्हा पैशासाठी आले. यामुळे संतप्त नागरिकांनी पथकातील पाच जवानांना धरून ठेवले होते. आधीच लोकांना रोजगार नाही. लहानसहान व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यात अतिक्रमणाच्या नावाखाली पथकाकडून हप्ता वसुली सुरु आहे. यामुळे नागरिक धास्तावले असून संताप व्यक्त करीत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एनडीएस पथक बरखास्त करावे, दोषीवर मनपाने कारवाई करावी,अशी भूमिका आमदार विकास ठाकरे यांनी मांडली.