मेट्रो रेल्वे : वर्धा रोडवर ५० पिलर, सहा स्थानकाचे काम सुरू नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत जमिनीवरून मेट्रो रेल्वे धावण्याकरिता रुळ टाकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मिहान डेपो ते विमानतळापर्यंत मेट्रो रेल्वे ५.६ कि़मी. जमिनीवरून अर्थात एटग्रेड सेक्शनमध्ये धावणार आहे. रुळ टाकण्यापूर्वी जमिनीवर मातीचा थर टाकून जमीन समतोल करण्याचे काम सुरू झाले आहे. रुळाचे आॅर्डर देण्यात आले आहे. रुळ टाकल्यानंतर ओएचई गर्डर आणि सिग्नलचे काम करण्यात येणार आहे. ओएचईकरिता खड्डा खोदण्याचे काम सुरू असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आपटे यांनी सांगितले की, वर्धा रोडवर दहा मेट्रो स्थानकापैकी विमानतळ, नवीन विमानतळ आणि खापरी स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. पूर्व-पश्चिम कॉरिडोरमध्ये रामझुलाच्या दुसऱ्या टप्प्यात मेयोकडील भागात मेट्रोचे आठ पिलर तयार होणार आहे. यापैकी दोन तयार झाले आहेत. चारचे काम लवकरच सुरू होणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावर इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स येथे वाया-डक्ट अर्थात पिलरवरून धावणाऱ्या मेट्रोकरिता पिलर निर्मितीचे काम सुरू आहे. अंबाझरी, बन्सीनगर आणि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्ससमोर मेट्रो रेल्वे स्थानकाचे काम सुरू झाले आहे. काँग्रेसनगर येथे मेट्रो पिलरचे बांधकाम सुरू आहे. आपटे म्हणाले, वर्धा रोडवर मेट्रोचे जवळपास ५० पिलर तयार झाले असून गर्डर टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत १५ गर्डर टाकण्यात आले आहेत. मेट्रो ट्रेन निर्मितीचे कंत्राट चीनच्या कंपनीला दिले आहे. ट्रेनची दुरुस्ती आणि देखभाल मिहान डेपोमध्ये होणार आहे. या डेपोचेही बांधकाम सुरू झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले होते. याशिवाय वर्धा रोडवरील डबल डेकर पुलासाठी पिलर उभारणीचे काम सुरू आहे. सौर ऊर्जेसाठी कंत्राट देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रुळ टाकण्याची तयारी पूर्ण
By admin | Published: December 29, 2016 3:04 AM