उपकरणाने दिली धोक्याची सूचना : सुरक्षा यंत्रणात खळबळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विमानतळावरील सुरक्षेच्या उपकरणांनी प्रवाशाच्या बॅगमध्ये काहीतरी वेगळे असल्याची ‘धोक्याची सूचना’ केली अन् पुढचे दोन तास सुरक्ष यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. बॅगमध्ये सापडलेले पांढरे पावडर स्फोटके असल्याच्या संशयावरून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच सोनेगाव पोलिसांनी या पावडरची तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली. त्यात काहीच धोक्याचे नसल्याचा तज्ज्ञांनी निर्वाळा दिला अन् त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. जेट एअरवेजच्या विमानाने नागपूरहून मुंबईला आणि तेथून न्यूयॉर्क (यूएसए) येथे जाण्यासाठी एक प्रवासी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. त्याच्या बॅगची तपासणी करणाऱ्या स्वयंचलित अत्याधुनिक उपकरणांनी बॅगमध्ये काहीतरी धोक्याची वस्तू असल्याचे संकेत दिले. त्यानुसार विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. लगेच त्या व्यक्तीला विचारपूस सुरू झाली. बॅगची तपासणी केली असता त्यात एक पांढरे पावडर असलेले पाकीट आढळले. हे पांढरे पावडर (पदार्थ) स्फोटक असल्याचा संशय वाढल्याने सुरक्षा यंत्रणात खळबळ उडाली. माहिती कळताच सोनेगावचे ठाणेदार संजय पांडे आपल्या ताफ्यासह पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त महेश सवाई हे सुद्धा पोहोचले. या सर्वांनी त्या पांढऱ्या पदार्थाची पाहणी केल्यानंतर ते ताब्यात घेतले. लगेच हा पदार्थ रासायनिक विश्लेषणासाठी राहाटे कॉलनीतील प्रयोगशाळेत आणण्यात आला. तोपर्यंत विमानतळावर स्फोटके सापडल्याच्या अफवेने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी त्या पदार्थाची तपासणी केली. त्यानंतर तो पदार्थ वनस्पतीजन्य पावडर असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
विमानतळावर स्फोटके सापडल्याची अफवा
By admin | Published: May 24, 2017 2:28 AM