योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत सोमवारी दुपारच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे खळबळ उडाली. या फोननंतर बॉम्बची शोधाशोध करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची धावपळ उडाली. सखोल शोधमोहीमेनंतर काहीच न सापडल्याने तो फोन अफवाच असल्याचे स्पष्ट झाले व सुरक्षायंत्रणांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन दुपारी साडेचार सुमारस नागपूर पोलिसांना आला. त्यानंतर तातडीने तेथे बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. इमारतीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. इमारतीचा कानाकोपरा तपासल्यावर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित फोन नेमका कुणी केला याचा पोलिसांनी शोध केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.