पोलीस अधीक्षकांचा इशारा : गोमांस नेत असल्याचा आरोपावरून सलीम शहाला मारहाणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथे बुधवारी गोमांस विक्रीला नेत असल्याचा आरोप करून सलीम शहाला कथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. गोमांस प्रकरणाच्या संबंधाने काही समाजकंटक उलटसुलट अफवा पसवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक वातावरण दूषित होण्याचा धोका वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ती ध्यानात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कणखर भूमिका घेतली आहे. त्यांनी अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांना कठोर कारवाई करण्याचा खणखणीत इशारा दिला आहे. या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी जलालखेडा पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले. भारसिंगी येथे तातडीने जिल्हा पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कुमक पाठविण्यात आली. भारसिंगी येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सलीमच्या काटोलातील घराशेजारीही साध्या वेशातील मोठा पोलीस बंदोबस्त निगराणी ठेवून आहे. आरोपींनाही तातडीने अटक करण्यात आली. असे असताना देखील काही समाजकंटक उलटसुलट अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू पाहात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी त्यांना कणखर इशारा दिला आहे. अफवा पसरवणारा लक्षात आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,असेही म्हटले आहे. भारसिंगी आणि काटोल किंवा नरखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चांगली आहे. भाजपकडून निषेध; कारवाईची मागणी भारसिंगी येथे सलीम इस्माईल शाह याला गोरक्षणाच्या नावावर बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा भाजपने स्पष्ट शब्दात निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी यासंबंधी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या घटनेशी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही. सलीम शाह हा भाजपचा कार्यकर्ता आहे. सन २०१३ ते २०१६ या कालावधीत तो पदाधिकारी होता. स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या कथित गोरक्षकांनी केलेले कृत्य संतापजनक आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. गोरक्षणाच्या नावावर हिंसा करणे, गुंडगिरी करणे, निर्दोष व्यक्तीला मारहाण करणे हे भाजपला मान्य नाही. आमदार डॉ. आशिष देशमुख, संघटन मंत्री किशोर रेवतकर, जि.प. शिक्षण सभापती उकेश चव्हाण, तालुका अध्यक्ष शामराव बारई, कार्याध्यक्ष इस्माईल भाई बारुदवाले, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मोमीनभाई पटेल, रमजानभाई अन्सारी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
अफवा पसरविणाऱ्यांनो...खबरदार!
By admin | Published: July 14, 2017 2:28 AM