नागपूर : महसूल विभागातील तलाठी व नायब तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत ग्रामसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पीएम किसान योजनेत महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने समन्वयातून काम केले. पण श्रेय कृषी विभागाने लोटून नेले. त्यामुळे महसूल व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या पीएम किसान योजनेचे काम ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांनी समान प्रमाणात केले. राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची संख्या लक्षात घेता सर्वात जास्त काम ग्रामसेवकांनी केले. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी व जिल्हा पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची समन्वयाची जबाबदारी पार पाडली. पीएम किसान योजनेत महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय काम केले. पण केंद्र सरकारने कृषी विभागाचाच सत्कार केला. ग्रामविकास विभागाचा साधा उल्लेखही केला नाही, त्यामुळे ग्रामसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामविकास विभागाच्या परवानगीशिवाय महसूल व इतर विभागाने ग्रामसेवक संवर्गास काम सांगू नये, अशी भावना ग्रामसेवक संघाचे राज्य उपाध्यक्ष रविकांत रेहपाडे यांनी व्यक्त केले.