नागपूर : मतदार कार्डला आधार क्रमांक जोडणी अभियान सुरु आहे. परंतु नागपुरात या अभियानाला थंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ १० लाख मतदारांनीच आधार कार्ड जोडणीसाठी अर्ज केला आहे. यातही ग्रामीण मतदारांचा चांगला प्रतिसाद असून शहरी मतदार याबाबत उदासीन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण इटनकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगामार्फत हे अभियान सुरु करण्यात आले आहे. यात मतदार कार्ड आधार क्रमांकाशी जोडायचे आहे. हे ऐच्छिक आहे. नागपूर जिल्हा या अभियानात सर्वात तळाशी होता. जिल्हाधिकारी इटनकर यांनी पुढाकार घेतल्याने यात थोडी आघाडी मिळाली असली तरी अजूनही नागपूर यात मागेच आहे. नागपूर जिल्ह्यात ४० लाख मतदार आहेत. यापैकी केवळ १० लाख मतदारांनीच जोडणीसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागातील मतदार आघाडीवर आहेत.
परंतु शहरातील मतदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. शहरातील मतदारांनी यासंदर्भातील असलेले गैरसमज दूर करावे आणि आपले मतदार कार्ड आधारशी लिंक करावे.
-बीएलओ आपल्या दारी दरम्यान ९२ हजार अर्ज
मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी जिल्ह्यात बीएलओ आपल्या दारी हे विशेष अभियान २४ सप्टेंबर रोजी राबवण्यात आले. त्यात एकाच दिवशी ९२ हजार मतदारांचे अर्ज भरण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. आता रेशन दुकानातही आधार लिंक करण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले.