नागपूर : ग्रामीण भागातील महिलांचे बचतगट तयार करून त्यांच्या हाताला कामे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जाते. या अभियानाचा पायलट प्रोजेक्ट २००८ मध्ये वर्धा जिल्ह्यातून सुरू झाला. त्याला ‘उमेद’ असे नाव देण्यात आले. या उमेदमध्ये कार्यरत असलेल्या प्रभाग संघ व्यवस्थापिकांचे मानधन शासनाच्या धोरणामुळे अडचणीत आले आहे. तुटपुंजा मानधनासाठी वर्धा जिल्ह्यातील ४२ व्यवस्थापिका गेल्या ७ दिवसांपासून संविधान चौकात दिवसरात्र उपोषणावर बसल्या आहेत. कुटुंब सोडून उघड्यावर उपोषणावर बसलेल्या या महिलांना पोटापाण्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न भेडसावत आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रात जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्हा या अभियानाचा पायलट प्रोजेक्ट आहे. यात कार्यरत असलेल्या ४२ प्रभाग संघ व्यवस्थापिकांनी १४ हजार महिला बचतगट जिल्ह्यात तयार केले आहेत. त्यांना सक्षम करण्याचे कार्य या महिला करीत आहेत. त्या मोबदल्यात त्यांना १० हजार रुपये मानधन मिळत होते. परंतु २०२२ च्या अखेरपासून या महिलांची मानधन वितरणाची पॉलिसी शासनाने बदलविली. आता त्यांना अभियानातून मानधन सरकार देणार नसून, महिला बचत गटाच्या प्रभाग संघातूनच त्यांना मानधन काढायचे आहे. परंतु प्रभाग संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने या महिलांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या या प्रोजेक्टला २०२७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पण या महिलांच्या मानधनाचे वांधे झाले आहेत. युवा परिवर्तन की आवाजचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात या महिला उपोषणाला बसल्या आहे.
- उपेक्षेबरोबर वेदनाही
वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असलेल्या या महिला कुटुंब सोडून ७ दिवसांपासून संविधान चौकात रस्त्यावर आहेत. रात्रीच्या बोचऱ्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढत आहे. महिलांना प्रातर्विधीच्या समस्या भेडसावत आहे. कुठल्यातरी एका पोलिसाने अभद्र भाषेत त्यांच्यावर चिखलफेक केली. रविवारी तर सकाळपासून त्यांची जेवणाची सोय नव्हती. अखेर पोलिसांनीच रात्रीला त्यांच्या जेवणाची सोय केली. कुटुंबाला आधार व्हावा यासाठी दोन पैशासाठी मोठ्या उमेदीने दिवसरात्र काम करणाऱ्या या महिलांची शासनाकडून उपेक्षा होत असल्यामुळे त्या रस्त्यावर आल्या, पण रस्त्यावरही कुचंबना आणि वेदना त्यांना सहन कराव्या लागत असल्याची भावना दीपमाला तिजारे, शालिनी पाटील, शीला घोरपडे, वंदना राऊत, सुनीता केचे यांनी व्यक्त केली.