लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबत वेगवेगळे समज, गैरसमज पसरविले जात असतानाच आदिवासीबहुल भागातील तरुणांमध्ये मात्र माेठी सकारात्मकता दिसून आली. देवलापार (ता. रामटेक) येथे १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात हाेताच पहिल्याच दिवशी ५९ तरुणांनी स्वत:चे लसीकरण करवून घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी लसीकरणाबाबत जनजागृती करायला सुरुवात केली आहे.
काेराेना प्रतिबंधक लसीबाबत वेगवेगळ्या व परस्परविराेधी बाबी प्रसूत केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नकारात्मकता तयार झाली हाेती. त्यातच शासनाने १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणाची घाेषणा केली आणि देवलापार येथील तरुणांनी तहसील प्रशासनाकडे देवलापार येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी रेटून धरली. त्यासाठी तरुणांनी तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांच्या या आग्रही मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
देवलापार येथे लसीकरणाला सुरुवात हाेताच पहिल्याच दिवशी ५९ तरुण व तरुणींनी लसीकरण करवून घेतले. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी याकडे पाठ फिरवली हाेती. तरुण मंडळी एवढ्यावर थांबली नाही तर, त्यांनी घरच्या मंडळींसाेबत इतरांनाही लस घेण्याचे फायदे समर्पक शब्दात समजावून सांगितले. या अभियानात धनश्री निघाेट, वैष्णवी गुप्ता यांच्यासह तरुण व तरुणी सहभागी झाल्या हाेत्या.