घाऊक भावात विक्री : दिल्लीवरून येताहेत पार्सलनागपूर : हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर मागील एका महिन्यापासून रेल्वेच्या पार्सल कार्यालयात हेल्मेटचे पार्सल घेण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी होत आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे परिसरातच घाऊक भावात हेल्मेट विकण्यात येत आहेत.रेल्वेच्या पार्सल कार्यालयात हेल्मेटचे पार्सल मोठ्या प्रमाणात येत आहेत. अंदाजानुसार दररोज १ हजार ते १२०० हेल्मेटचे पार्सल येत आहेत. यामुळे रेल्वेच्या महसुलात भर पडली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हेल्मेट येत असल्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींनाही काम मिळत आहे. याशिवाय स्थानिक रेल्वे पार्सल कार्यालयाऐवजी जेथून हे हेल्मेट पाठविण्यात येत आहेत, त्या रेल्वे पार्सल कार्यालयाला याचा लाभ होत आहे. नागपुरात दिल्लीवरून हेल्मेट मागविण्यात येत आहेत. हे हेल्मेट तेलंगणा एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, तामिळनाडू एक्स्प्रेस, समता एक्स्प्रेसने नागपुरात येत आहेत. सिकंदराबाद, विजयवाडा येथूनही सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेसने हेल्मेट येत आहेत. एका पार्सलमध्ये २० हेल्मेट राहतात. त्याची किंमत ठोक भावात १५० ते २२५ सांगण्यात येत आहे. दुसरीकडे हेल्मेटची अचानक वाढलेली मागणी पाहता गांधीबाग, बजेरिया, सीताबर्डीमध्ये व्यापाऱ्यांनी गोदाम उघडले आहेत. संधीचा फायदा घेण्यासाठी या उद्योगात नवे लोग जुळले आहेत. रेल्वेच्या पार्सल कार्यालयातही हेल्मेटची घाऊक भावात विक्री होत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
हेल्मेटसाठी रेल्वे पार्सल कार्यालयात गर्दी
By admin | Published: March 03, 2016 3:07 AM