युक्रेन युद्धामुळे विजेचे संकट! अमोनियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:57 PM2022-03-01T12:57:08+5:302022-03-01T12:59:27+5:30

रशिया-युक्रेन युद्धाचा आता भारतावरही होऊ लागला असून, महाराष्ट्रात विजेचे संकट उभे ठाकले आहे.

russia ukraine conflict causes power crisis coal scarcity in power plants due to deficiency of ammonium nitrate | युक्रेन युद्धामुळे विजेचे संकट! अमोनियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई

युक्रेन युद्धामुळे विजेचे संकट! अमोनियम नायट्रेटच्या कमतरतेमुळे वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई

Next

कमल शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. याचा परिणाम आता भारतावरही होऊ लागला आहे. महाराष्ट्रात विजेचे संकट उभे ठाकले आहे. भुसावळ व परळी वीज केंद्रातील प्रत्येकी एक संच कोळशाच्या टंचाईमुळे ठप्प पडले आहे. खापरखेडा व चंद्रपूर सोडून इतर केंद्रांमध्ये काेळशाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. 

उन्हाळा जाणवू लागताच राज्यात विजेची मागणी २३ हजार मेगावॉटच्या वर पोहोचली आहे. दुसरीकडे कोळशाच्या टंचाईमुळे वीज केंद्र ऑक्सिजनवर आहेत. महाजेनको व वेकोलिचे अधिकारी यासाठी रशिया-युक्रेन युद्धाला जबाबदार धरत आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, कोळसा उत्खननासाठी खाणींमध्ये स्फोट करावा लागतो. यासाठी अमोनियम नायट्रेटची आवश्यकता आहे. ते सीएनजीद्वारा उत्पादित केले जाते. बहुतांश गॅसचा पुरवठा हा रशियावरून होतो. परंतु सध्या युद्धामुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. स्फोटकांच्या कमतरतेमुळे वीज केंद्र अगोदरच कोळशाच्या टंचाईने त्रस्त होते. युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

भारनियमनाचे संकट!

सरकारी वीज केंद्रांसोबतच खासगी वीज केंद्रांमध्येही कोळसा संकट निर्माण झाले आहे. महावितरणला वीजपुरवठा करणारी सीजीपीएल प्रकल्पातील चार युनिट याच कारणामुळे  बंद पडली आहेत. राज्याला लोडशेडिंगपासून वाचवण्यासाठी जलविद्युत प्रकल्पांचे उत्पादन ११८३ मेगावॉटपर्यंत वाढवण्यात आले आहे. पॉवर एक्स्चेंजकडूनही १३०० मेगावॉट वीज महागड्या दरावर खरेदी करण्यात आली आहे.

ऊर्जा, रेल्वे व कोळसा मंत्रालय झाले सक्रिय 

कोळशाच्या टंचाईमुळे निर्माण होणाऱ्या वीज संकटाबाबत केंद्र सरकार सक्रिय झाले आहे. ऊर्जा, रेल्वे आणि कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. महाजेनकोचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले हाेते.

सध्याची स्थिती काय?
संयंत्र साठा (दिवसाचे) 
- कोराडी - २.६ 
- खापरखेडा - १२ 
- नाशिक - १.६ 
- परळी - १.५ 
- भुसावळ - ०.८ 
- पारस - ४. २५
- चंद्रपूर – ६
 

Web Title: russia ukraine conflict causes power crisis coal scarcity in power plants due to deficiency of ammonium nitrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.