लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल युद्धातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी केले.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भोसला मिलिटरी स्कूलद्वारा आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर, सूर्यरतन डागा, कर्नल (सेवानिवृत्त) जे. एस. भंडारी, कुमार काळे, अजय शिर्के उपस्थित होते. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी कारगिल वीरांच्या शौर्याचे पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. कारगिल युद्धानंतर आता कोणतेही शत्रूराष्ट्र वा संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा देश तो हल्ला कदापिही सहन करणार नाही. तो हल्ला परतवून लावेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी हे युद्ध यशस्वीरीत्या पार पाडले.कारगिल युद्धामध्ये देशातील अनेकांनी आपला पती, भाऊ, मुलगा गमावला. मात्र, देशातील जनतेने त्यांना त्याची कधीही जाणिव होऊ दिली नाही. हा देश वीरमाता, वीरपिता, वीरपत्नींच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन शैलेश जोगळेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी कारगिल विजय दिवसानिमित्त चित्रफितही दाखविण्यात आली. कारगिल विजय दिवसानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या ५१४ कॅडेसनी शानदार परेड सादर केली. दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या परेडने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अश्वस्वारही या परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडनंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना सलामी देण्यात आली. यावेळी भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.