नागपूर : राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. आपला देश, हा समाज हा दुखी आत्म्यांचा महासागर आहे. जे मंत्री होणार होते ते आता त्यांना संधी मिळणार की नाही या विचाराने दु:खी आहे. कारण एवढी गर्दी झाली आहे. हे इच्छुक अगोदर सूट बूट शिवून तयार होते व आपला क्रमांक कधी येतो याची वाट बघत होते. आता सूट आहे, मात्र त्याचं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रमादरम्यान ते गुरुवारी सायंकाळी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आ.रामदास आंबटकर, मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे, महामंत्री डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात लोक दु:खाच्या महासागरात आहेत. आमदार झाले नाही म्हणून नगरसेवक दु:खी आहेत, मंत्री झाले नाही म्हणून आमदार दु:खी आहेत व चांगले खाते मिळाले नाही म्हणून मंत्री दु:खी असल्याचे दिसून येते. शेवटी जे आहे त्यात समाधान मानणे महत्त्वाचे असते, असे गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरी यांनी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावरदेखील भाष्य केल. राजकारण हे विद्यापीठ व महाविद्यालयांपासून दूर ठेवले पाहिजे. शैक्षणिक कॅम्पसमध्ये पक्षांच्या राजकारणाला थारा देऊ नये. शिक्षक निश्चितच राजकारणात जाऊ शकतात, मात्र शैक्षणिक परिसरांमध्ये त्याला येऊ देऊ नका, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवड व नियुक्ती झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडवाविद्यापीठांमध्ये भविष्यातील आव्हाने व उद्योगक्षेत्राच्या गरजा लक्षात ठेवून अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैतिक व आर्थिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम होतील असे शिक्षण दिले पाहिजे. नागपूर विद्यापीठात शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्रात समन्वय दिसून येत नाही. विद्यार्थीदशेतच कौशल्य देत अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.